द्वितीय मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचने पहिला सेट गमाविल्यानंतरही विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, मात्र महिला एकेरीत अव्वल मानांकित पोलंडची इगा स्विटेकचे तिसऱया फेरीतच आव्हान संपुष्टात आले.
जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या एलेक्सेई पोपिरिनचा 4-6, 6-3, 6-4, 7-6 असा पराभव करत कारकीर्दीत 16 व्यांदा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. रॉजर फेडररने सर्वाधिक 18 वेळा या स्पर्धेची चौथी फेरी गाठली होती. याचबरोबर जोकोविच हा एक हजारहून अधिक ऐस लगावणारा सहावा खेळाडू ठरला. जोकोविचच्या आधी फेडरर, गोरान इवानिसेविच, पीट सॅप्रास, जॉन इस्नर व इवो कारलोविच यांनी ही कामगिरी केलेली आहे.
महिला एकेरीत जेतेपदाची दावेदार असलेल्या इगा स्विटेकला पराभवाचा धक्का बसला. तिला बिगरमानांकित युलिया पुतिंत्सेवा हिने 3-6, 6-1, 6-2 असे हरविले. या पराभवाबरोबरच स्विटेकचा सलग 21 लढती जिंकण्याच्या अभियानाला ब्रेक लागला.