इंग्लंड आणि स्वित्झर्लंड यांच्यातील गोलचा संघर्ष 90 मिनिटांच्या खेळात बरोबरीत सुटल्यानंतर 30 मिनिटांच्या ज्यादा खेळातही सामना 1-1 असाच संपला. मग पेनल्टी शूटआऊटच्या आरपार लढाईतही दोन्ही संघ एकमेकांवर जोरदार किक प्रहार करत होते. सामना थरारक चालला होता. तेव्हाच इंग्लिश गोलरक्षक जॉर्डन पिकपर्ह्डने मॅन्युअल अंकाझीची पहिलीच किक अडवत संघाला पूर्ण सामन्यात प्रथमच 1-0 अशा आघाडीवर नेले आणि त्यानंतर इंग्लंडने ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखत 5-3 अशा विजयासह उपांत्य फेरीत धडक मारली. आता इंग्लंडला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी नेदरलॅण्ड्सला नमवावे लागणार आहे.
उभय संघांमधला संघर्ष तब्बल 75 मिनिटे गोलशून्य होता. गोलांचे खाते उघडण्यासाठी इंग्लंडइतकीच ताकद स्वित्झर्लंडचे आक्रमकही लावत होते. पण गोलजाळय़ापर्यंत कुणाचीही अचूक फटका पोहोचत नव्हता. तेव्हाच स्विर्त्झंडच्या ब्रील एम्बोलोने इंग्लंडचे क्षेत्ररक्षण भेदत केलेल्या गोलने साऱयांच्याच पोटात गोळा आणला होता. पण स्वित्झर्लंडचा हा आनंद फार काळ टिकला नाही. बुकायो साकाने अवघ्या पाच मिनिटानंतरच इंग्लंडला बरोबरीत पोहोचवणारा फटका मारत सामन्यात जान आणली. त्यानंतर पुढील दहा मिनिटे दोघांनी विजयी गोल करण्याचा प्रयत्न केला, पण यश कुणाच्याही पदरात पडले नाही.
मर्यादित 90 मिनिटांच्या खेळात जे घडले नाहीत ते पुढील 30 मिनिटांच्या खेळातही घडू दिले नाही. अतिरिक्त खेळात दोन्ही संघांनीही गोल्डन गोलसाठी आपले सर्वस्व पणाला लावले, पण यश मात्र कुणालाच टिपता आले नाही आणि 120 मिनिटांचा संघर्ष 1-1 असा पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला.
पिकफोर्ड ठरला हीरो
120 मिनिटांचा संघर्ष 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला आणि पिकफोर्ड आणि यान सोमर या गोलरक्षकांकडे साऱयांच्या नजरा लागल्या होत्या. इंग्लंडच्या पामरने आपल्या पहिल्याच किकला गोलजाळय़ात मारले आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मग पिकफोर्डने मॅन्युअल अंकाझीच्या किकला गोलजाळय़ापासून अडवले आणि सामन्याला कलाटणी देणारी कामगिरी केली. पिकफोर्डचा हा बचाव इंग्लंडला उपांत्य फेरीत घेऊन गेला. त्यानंतर बेलिंगहॅम, साका, टोनी आणि अरनॉल्ड यांनीही आपापल्या किकला गोलचा टिळा लावला आणि पेनल्टी शूटआऊटचे एन्काऊंटर 5-3 असे जिंकले.
पेनल्टी शूटआऊट
इंग्लंड स्वित्झर्लंड
पामर अंकाझी
बेलिंगहॅम शार
साका शाकिरी
टोनी अमडोनी
अरनॉल्ड
डचचा विजय
नेदरलॅण्ड्स आणि तुर्की यांच्यातील लढतही रोमहर्षक झाली. तुर्कीला सामेत अकायदिनने 35 व्या मिनिटाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढील 35 मिनिटे तुर्की आघाडीवरच होती. मग 70 व्या मिनिटाला स्टिफन डे व्रिजने गोल ठोकत डचला बरोबरी साधून दिली. अवघ्या पाच मिनिटांनी तुर्कीच्या मॅट मटलरकडून आत्मघातकी स्वंयगोल झाला आणि सामना डचच्या बाजूने फिरला. मग 2-1 ने आघाडीवर असलेल्या नेदरलॅण्ड्सने तुर्कीला बरोबरीपासून दूर ठेवत आपल्या उपांत्य फेरी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.