ऑलिम्पिकपूर्वी विनेश फोगाटची दमदार कामगिरी, स्पेन ग्रां. प्री. स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक करणारी हिंदुस्थानची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने ऑलिम्पिकची रंगीत तालीम असलेल्या स्पेन ग्रां. प्री. स्पर्धेत दमदार कामगिरी केली. तिने महिलांच्या 50 किलो गटात रशियाच्या मारिया तियुमेरेकोवा हिचा पराभव करीत सुवर्णपदकावर मोहर उमटवली.

विनेश फोगाटला बुधवारी अखेरच्या क्षणी स्पेनसाठी विजा मिळाला होता, मात्र तिने आपल्या ताकदवर खेळाचे दमदार प्रदर्शन करीत चारही लढती जिंकून सुवर्णपदकाला गवसणी घातली. विनेशने किताबी लढतीत मारिया तियुमेरेकोवा हिला 10-5 गुण फरकांनी लोळवून आपण पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचा इशारा इतर प्रतिस्पर्धी कुस्तीपटूंना दिलाय. 29 वर्षीय विनेश पह्गाटने क्यूबाच्या युस्नेलिस गुजमॅन हिचा 12-4 गुणफरकाने पराभव करीत या स्पर्धेचा धडाकेबाज प्रारंभ केला. त्यानंतर 2022 च्या बार्ंमगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या कॅनडाच्या मॅडिसन पार्क्स हिला हरवून विनेशने आगेकूच केली. उपांत्य फेरीत या हिंदुस्थानी कुस्तीपटूने कॅनडाच्याच केटी डचक हिला 9-4 गुणफरकांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी फ्रान्समध्ये 20 दिवसीय प्रशिक्षणात सहभागी होणार आहे.