सिद्धिविनायकसमोरील इमारतीचे आठ मजले बेकायदा

सिद्धिविनायक मंदिरासमोरील ऋषिकेश इमारतीचे आठ मजले बेकायदा असून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. नगरविकास खाते (यूडीडी), महापालिकेची दिशाभूल करून एफएसआय लाटला व अतिरिक्त आठ मजल्यांचे बांधकाम झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

गुलमोरीवाडी एसआरए को-ऑप. हौ. सोसायटी (प्रस्तावित), सोसायटीचे अध्यक्ष विजय मयेकर व अन्य यांनी अॅड. संजील कदम यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. यूडीडीने अतिरिक्त मजल्यांसाठी दिलेली मंजुरी व पालिकेने दिलेली ओसी न्यायालयाने नुकतीच रद्द केली आहे. 20 मार्च 2023 रोजी न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे अतिरिक्त आठ मजले अनधिकृत असल्याचे स्पष्ट होते. रीतसर पाठपुरावा करूनही पालिका कारवाई करत नसल्याने न्यायालयानेच कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.