180 व्या वर्षात पदार्पण करताच गॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय व सर जे. जे. रुग्णालय समूहाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगभरातील डॉक्टर्स आता जे. जे. तील शस्त्रक्रियांमधून धडे गिरवणार आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक शस्त्रक्रिया एन्डोस्कोपीद्वारे यशस्वीरीत्या कशा करता येऊ शकतात याचे उदाहरण जे. जे. च्या डॉक्टरांनी नेदरलॅण्डमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत जगासमोर ठेवले.
नेदरलॅण्डच्या मास्ट्रीच येथे युरोपियन असोसिएशन ऑफ एंडोस्कोपिक सर्जरी 2024 ही परिषद पार पडली. जे. जे. रुग्णालयातील सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अर्शद खान, डॉ. अमोल वाघ, डॉ. काशिफ अन्सारी आणि डॉ. सुप्रिया भोंडवे या परिषदेत सहभागी झाले होते. या टीमने केलेल्या 13 विविध आव्हानात्मक शस्त्रक्रियांच्या व्हिडीओंनी या परिषदेत वाहवा मिळवली. त्यातील दोन व्हिडीओंनी जगातील टॉप 7 मध्ये बाजी मारून जागतिक वैद्यकक्षेत्रात महाराष्ट्राची शान वाढवली.
या टीमने अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया एन्डोस्कोपीद्वारे यशस्वीरीत्या केल्या आहेत. त्याद्वारे रुग्णांना नवजीवनही मिळाले आहे. त्या शस्त्रक्रियांचे व्हिडीओ भावी सर्जन्ससाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. शस्त्रक्रियांची काटेकोर माहिती देणारी पाच पोस्टर्सही सादर केली गेली. या यशाबद्दल रुग्णालयाच्या अधिष्ठाता व बालरोगतज्ञा डॉ. पल्लवी सापळे यांनी डॉक्टरांच्या टीमचे कौतुक केले आहे.