जम्मू-कश्मीरात 48 तासांपासून धुमश्चक्री, सहा दहशतवाद्यांचा खात्मा; दोन जवान शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या 10 वर्षांत दहशतवादी हल्ले घटल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केला होता; परंतु त्यांचा हा दावा अवघ्या चारच दिवसांत पह्ल ठरला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुलगाम येथे गेल्या 48 तासांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांचे जवान यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरूच असून या चकमकीत जवानांनी चोख प्रत्युत्तर देत सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले.

मुदरघम आणि चिनिगाम फ्रिसालमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादी कारवाई सुरू केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाली. मुदरघममध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची आणि चिनीगाम प्रिसलमध्ये आणखी एक दहशतवादी लपला असण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून तब्बल सहा दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आल्याचे जम्मू आणि कश्मीरचे पोलीस महासंचालक आरआर स्वैन यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. दरम्यान, आज सकाळी मुदरघममध्ये एका दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. येथे शनिवारी दुपारी दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद झाला. पुलगामच्या चिनिगाम फ्रिसलमध्ये काल चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर आणखी एक जवान शहीद झाला.

राजौरीत लष्कराच्या तळावर हल्ला

जम्मू-कश्मीरमधील राजौरी जिह्यातील मांजाकोट भागात दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दहशतवादी घनदाट जंगलात पळून गेले. लष्कर आणि पोलिसांनी या भागात दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू केली आहे.

गेल्या महिनाभरात झालेले दहशतवादी हल्ले

– 9 जून : शिवखोरी येथून कटरा येथे जाणाऱया भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी 25 ते 30 राऊंड गोळीबार केला. यात चालकाला गोळी लागली. त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. या घटनेत 9 भाविकांचा मृत्यू झाला, तर 41 भाविक जखमी झाले.
– 11 जून : पाकिस्तानच्या सीमेजवळील हिरानगरच्या सैदा सोहल गावात दोन दहशतवाद्यांनी घरांचे दरवाजे ठोठावले आणि पाणी मागितले. गावकऱयांना संशय आल्याने त्यांनी घराचे दरवाजे बंद करून आरडाओरडा केला. त्यामुळे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक गावकरी जखमी झाला. एका दहशतवाद्याने डीआयजी आणि एसएसपी यांच्या वाहनावर गोळीबार केला. ग्रेनेड फेकताना त्याचा मृत्यू झाला.
– 11 जून : भेदरवाह-पठाणकोट मार्गावरील 4 राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांच्या संयुक्त चेकपोस्टवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात 5 सैनिक आणि एक विशेष पोलीस अधिकारी जखमी झाला.
– 12 जून रोजी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. पोलिसांनी दहशतवाद्यांकडून अमेरिकन बनावटीची एम 4 कार्बाईन जप्त केली.
– 17 जून : जम्मू-कश्मीरमधील बंदीपोरा येथे लश्करचा दहशतवादी कमांडर उमर अकबर लोन ऊर्फ जाफर याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला.
– 19 जून : जम्मू-कश्मीरमधील बारामुल्ला येथील हदीपोरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यात दोन दहशतवादी ठार झाले.
– 22 जून : जम्मू-कश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱया दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले.
– 26 जून : डोडा जिह्यातील गंडोह भागात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.