जम्मू-कश्मीरमध्ये कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या अकोला जिह्यातील मोरगाव भाकरे येथील जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ या 24 वर्षीय जवानाचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हा ते सुट्टीत घरी आले होते. ते 2020 मध्ये महार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. चार महिन्यांपूर्वी सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिह्यात त्यांना पाठवण्यात आले होते.
पथकासोबतच कुलगाम जिह्यातील मोडरगम येथे शनिवारी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. तेथे सहा दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. चौघांचा खात्मा केल्यानंतर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याची माहिती आहे. रेजिमेंटच्या अधिकाऱयांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमा ज्ञानेश्वर माळी आणि जंजाळ यांच्या कुटुंबयांशी संपर्क साधून प्रवीण जंजाळ हे शहीद झाल्याची माहिती दिली. याबाबत कळताच जंजाळ कुटुंब आणि मोरगाव भाकरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. चारच महिन्यांपूर्वी प्रवीण यांचा विवाह झाला होता. त्यांची पत्नी आणि आईने अक्षरशः हंबरडा पह्डला. त्यावेळी गावकऱयांचे मनही हेलावले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
ती भेट शेवटची ठरली
चार महिन्यांपूर्वी ते गावी सुट्टीवर आले होते. प्रवीण यांची कुटुंबीयांसोबतची ही भेट शेवटची ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गायगाव येथे झाले होते. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी अक्षरशः रात्र जागून काढली. प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्यांच्या आधी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ आणि काका रवींद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले होते. दरम्यान, प्रवीण यांनी कालच घराच्या बांधकामासाठी त्यांच्या वडिलांसाठी 39 हजार रुपये पाठवले होते.