कोळथरे ब्राम्हण आळीतून पुढे आपताडी मार्गे बुरोंडी दापोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील रस्त्यात उन्हाळयातच मोठमोठे खड्डे पडले होते. रस्त्यात पडलेल्या या खड्डयांमध्ये आता पावसाचे पाणी तुंबून पाण्याचे डोह तयार झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक धोक्याची झाली आहे.
दापोली तालक्यातील पर्यटनाच्यादुष्टीने अतिशय महत्वाचे गाव म्हणून कोळथरेला पर्यटकांची सर्व प्रथम पसंती मिळत असते.
त्यामुळे या मार्गावर पर्यटकांची वर्दळ असते. वर्दळीच्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना चालताना सुद्धा अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच खड्डे मोठे असल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनांचे चांगलेच नुकसान होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागासह येथील लोकप्रतिनिधींना याचे काहीही पडलेले नाही.
“विकास विकास म्हणजे हाच का? महायुती सरकारची विकासाची व्याख्या तरी काय आहे.अशाप्रकारचा सवाल उपस्थित करीत. हा रस्ता गणपतीपूर्वी वाहतुकयोग्य करण्यात आला नाही, तर जनहितासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करणे भाग पडेल.” असा इशारा संजय कदम (माजी आम.आणि शिवसेना जिल्हा प्रमुख उत्तर रत्नागिरी) यांनी दिला आहे.