विज्ञान-रंजन – लाजरीच्या रोपट्याला…

‘लाजरीच्या रोपटय़ाला दृष्ट नका लावू, नका गडे माझ्याकडे पाहू’ असं ग. दि. माडगूळकरांचं एक खूप जुनं भावगीत आहे. गजानन वाटवे यांनी संगीत दिलेलं हे गाणं गोविंद कुरवाळकर यांनी गायिलेलं आहे. हे अर्थातच प्रेमगीत आहे. पण त्यात जो लाजाळूच्या रोपटय़ाचा उल्लेख आहे तो स्पर्श, फुंकर किंवा तीव्र उन्हाने पानं मिटून घेणाऱया आणि वेलीसारख्या जमिनीवर पसरत जाणाऱया वनस्पतीचा आहे. वनस्पती-तज्ञ या रोपटय़ाविषयी काय म्हणतात? ही वेलीसारखी वाढणारी, पण रोपटय़ासारखी दिसणारी वनस्पती नेमकं असं का वागते? हे विषय वैज्ञानिक कुतूहलात येतात. आपण विज्ञानातल्या काही गोष्टी त्यातला क्लिष्ट तांत्रिक भाग वगळून निदान वैज्ञानिक विचारांचा परिचय व्हावा अशाप्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो. तो रंजक असला तर विज्ञानाची गोडी निर्माण होईल. म्हणूनच आम्ही खगोलशास्त्र्ााचा अभ्यास करताना, आकाशदर्शन घडवताना आधुनिक दुर्बिणींचा वापर करून विश्वरचनाशास्त्र्ाातलं सत्य सांगण्याचा प्रयत्न करतोच. पण त्याचबरोबर अवकाशातील नक्षत्र, राशी आणि तारका समूहांच्या देशी-विदेशी प्राचीन कथाही सांगतो. त्यामुळे त्यापलीकडचं विज्ञान लक्षात राहाते असा अनुभव आहे.

दोन-तीन आठवडय़ांपूर्वी एका मित्राच्या फार्महाऊसवर जाण्याचा योग आला. अनेक एकरांवर त्याने जिद्दीने वाढवलेलं विविध वनस्पतीचं जंगल आणि नुकत्याच झालेल्या पावसाने सर्वत्र उमटलेली हिरवळ यामुळे मन प्रसन्न झालं. त्या निसर्गसौंदर्याचे अनेक फोटो काढले. त्यातला एक होता लाजाळूच्या विस्तृत परिसराचा. हात लावताच किंवा फुंकर मारल्यावर त्याची पानं मिटतात याचा अनुभव वय विसरून सर्वांनी घेतला. म्हणून आज त्या रोपटय़ाविषयी.

लाजाळूचं वैज्ञानिक नाव आहे मायमोसा प्युडिका. त्याला सेन्सेटिव्ह प्लान्ट, स्लीपी प्लान्ट, अॅक्शन प्लान्ट, हम्बल प्लान्ट, शॅमेप्लान्ट किंवा बोली इंग्रजीत ‘टच मी नॉट’ वनस्पती असं संबोधलं जातं. या सगळ्यांपेक्षा मला आपलं मराठी नाव लाजाळू किंवा लाजरी हे अधिक योग्य वाटतं. कारण त्यातून आपण त्या छोटय़ाशा रोपाला एक ‘व्यक्तिमत्त्व’ देऊन आपलंसं करतो.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे लाजाळू क्रिकिंग म्हणजे वेलीसारखं पसरतं. इतर अनेक संवेदनाशील वनस्पतींप्रमाणे ते नायक्टिनॅस्टिक किंवा ‘झोपाळू’ पद्धतीचं असतं. अशा अनेक वनस्पती कधी स्वसंरक्षणासाठी, सूक्ष्म भक्ष पकडून ठेवण्यासाठी, बाष्पीभवन कमी होण्यासाठी अथवा सूर्यप्रकाशात तयार केलेलं हरितद्रव्य टिकवण्यासाठी स्वतः दृश्य बदल घडवतात.

तसं तर प्रत्येक वनस्पती सजीवच असते आणि तिला संवेदना असतात हा महत्त्वाचा शोध, प्रयोगाने सिद्ध केला तो हिंदुस्थानी संशोधक जगदीशचंद्र बोस यांनी. अन्नपाण्याचा तुडवडा जाणवला किंवा अतिरेक झाला तर अशा वनस्पती त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात. साधा शाळकरी प्रयोग आठवा. एका बंद डब्याला एकाच बाजूने हवा जाईल अशी जागा ठेवली तर आत रुजवलेल्या बियाणातून उगवलेलं रोपटं त्या तेवढय़ाशा जागेतून सूर्यप्रकाशाचा शोध घेत बाहेर येतं. आसपासच्या झाडांची वाढ आपण कधी कुतूहलाने पाहात नाही किंवा आपल्या लक्षात येत नाही.

‘पिचर’ प्लान्ट प्रकारच्या वनस्पती द्रव भरलेल्या नळीसारख्या आणि त्यावर ‘झाकण’ असलेल्या असतात. मराठीत त्याला घटपर्णी म्हणतात. त्या वेळच्या शालेय पुस्तकात या घटपर्णीचं चित्र होतं. विशेष म्हणजे आमच्या राजावाडीतील बारमाही ओढय़ाच्या काठी ज्या अनेक वनस्पती होत्या त्यात ही घटपर्णी दिसायची. ही मुंबईतली गोष्ट आहे. खेडोपाडय़ातील वनविभागात तर अशा अनेक विस्मयकारी वनस्पती असतात. सुमारे सत्तर गडकिल्ले पाहताना होणाऱया दऱया-डोंगरांच्या प्रवासात अशी अनेक घनदाट वनश्री आणि विविध प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळाल्या. केवळ पळसाच्या फुलांचा बहर अनुभवण्यासाठी आम्ही तावलीच्या डोंगरावर जायचो आणि एखादा आदिवासी तिथल्या औषधी वनस्पतींची माहिती द्यायचा. त्या वेळी हाती व्हिडीओ करणारे मोबाईल नसायचे. नाहीतर दुर्मिळ माहितीचा खजिना जमवता आला असता.लाजाळूसारख्या वनस्पती ‘रॅपिड प्लान्ट मूव्हमेन्ट’ म्हणजे वेगाने वाढणाऱया वनस्पतींच्या गटात येतात. दिवसाला काही सेंटीमीटर वाढ होणारा बास किंवा वेळू आणि काही बाडगूळ वेलींसारख्या वनस्पती आमच्या उंबरोलीच्या जागेच्या आसपासही आढळतात. त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.

तर लाजाळूच्या विषयाची सांगता करताना ‘झोपणाऱया’, ‘मिटणाऱया’ किंवा ‘लाजणाऱया’ रोपाची छोटी डहाळी (फांदी) रात्री पानं मिटून खाली वाकते. हे सारं ही वनस्पती आपली ऊर्जा वाचवण्यासाठी करते आणि दिवस उजाडला की हरितद्रव्य तयार करायला, सूर्यप्रकाश पिऊन तरतरीत व्हायला सज्ज होते.

निसर्गातल्या अशा छोटय़ा-मोठय़ा सजीव रचनांकडे आपलं लक्ष जात नाही. गेलं तर कुतूहलापलीकडे जाऊन त्यामागचं रहस्य समजावून देणारं विज्ञान घेण्याचा प्रयत्न तर क्वचितच होतो. आपलं जग केवळ माणसांचं नाही. अब्जावधी वनस्पती, कीटक, पशु-पक्षी यांचंही आहे. आषाढी एकादशी जवळ येतेय. पंढरपूरकडे दिंडय़ा निघाल्या आहेत. तेव्हा तुकोबांचा ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ हा अभंग सर्वांनाच डोळसपणे लक्षात घ्यायला पाहिजे असं वाटतं. तरच भोवतीचा निसर्गही समजू शकेल.
 विनायक