13 जुलैपर्यंत आरक्षण द्या… अन्यथा 288 उमेदवार पाडणार! मनोज जरांगे यांचा महायुतीला इशारा

येत्या 13 जुलैपर्यंत आरक्षण द्या; अन्यथा राज्यातील सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात उमेदवार उभे करून महायुतीचे सरकार पाडू, असा सणसणीत इशारा मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी दिला.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रविवारी सायंकाळी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जोरदार सभा झाली. तत्पूर्वी, परभणी शहरातून मुख्य मार्गावरून भव्य मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जाहीर सभेत झाला. चारही रस्त्यांवर मराठा समाजबांधव प्रचंड संख्येने आले होते. या सभेसाठी भव्य व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली होती.

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी इंचभरसुद्धा मागे हटणार नाही, मॅनेज होणार नाही, त्यांच्याकडून कोणतेही पद घेणार नाही, माझ्या ताटात खाणारे फुटले तरी किंवा माझ्याविरुद्ध बोलले तरीही मी माझ्या मायबाप समाजाच्या लेकरांसाठी व समाजासाठी कधीही गद्दार होणार नाही, असा माझा शब्द आहे.

ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्यांना व त्यांच्या सग्यासोयर्‍यांना सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे व सरसकट मिळाले पाहिजे. माझी ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला नम्र विनंती आहे की, एकमेकांच्या अंगावर जाऊ नका. ओबीसी नेता जो मराठ्यांना त्रास देतो, त्यांना या निवडणुकीत पाडल्याशिवाय राहायचं नाही. आम्ही एकगठ्ठा मतदान केले म्हणजे आम्ही जातीयवादी आहोत म्हणता, आणि तुम्ही एकगठ्ठा मतदान करता, मग तुम्ही कोण आहात? असा सवालही त्यांनी केला. मराठ्यांनी आपली ताकद लोकसभेला दाखवून दिली तशीच यापुढेही विधानसभा निवडणुकीला एकजूट दाखवून द्या. 100 टक्के मतदान करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जर महायुतीतील घटक पक्षांनी या प्रश्नाकडे पुन्हा कानाडोळा केला, तर तिन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागेल. सरकारने मुदतीच्या आत या गोष्टीचा गांभीर्याने व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार न केल्यास आगामी निवडणुकीत 288 उमेदवार उभे करायचे की 288 उमेदवार पाडायचे हे ठरवावे लागेल, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे बजावले. महायुतीतील मराठा आमदारांनी याबाबत कुचराई केल्यास त्या सर्व आमदारांनाही निवडणुकीत सर्वसामान्य मराठा समाज जागा दाखवून देईल, असा इशाराही जरांगे यांनी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत भुजबळ यांच्यासह जो कोणी ओबीसी नेता लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलेल त्याच्या विरोधात सकल मराठा समाजही भक्कमपणे विरोधासाठी उभा राहील, असे जरांगे म्हणाले.