पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे हिंदुस्थानचा युवा संघ काहीसा अडचणीत आला होता. मात्र दुसऱ्या टी20 सामन्यात दमदार पुनरागमन करत टीम इंडियाने झिम्बाब्वेचा तब्बल 100 धावांनी पराभव केला आहे. मुकेश कुमार आणि आवेश खान यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे झिम्बाब्वेच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 134 या धावसंख्येवर बाद झाला.
2ND T20I. India Won by 100 Run(s) https://t.co/yO8XjNqmgW #ZIMvIND
— BCCI (@BCCI) July 7, 2024
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना हरारेमध्ये पार पाडला. टीम इंडियाने झिम्बाब्वेला 235 धावांचे आव्हान दिले होते.आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला झिम्बाब्वेच्या फलंदाजांचा टीम इंडियाच्या गोलंदाजांपुढे निभाव लागला नाही. वेसली मधेवरे (43 धावा), ब्रायन बेनेट (26 धावा) आणि जोंगवे (33 धावा) यांनी झिम्बाब्वेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना इतर फलदाजांची साथ लाभली नाही. त्यामुळे झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 134 या धावसंख्येवर बाद झाला. या विजयामुळे टीम इंडियाने मालिकेत बराबरी (1-1) साधली आहे. टीम इंडियाकडून मुकेश कुमार आणि आवेश खान यांनी 3-3 विकेट घेतल्या, तर रवी बिश्नोई दोन आणि वॉशिंग्टन सुंदर याने एक विकेट घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल (2 धावा) स्वस्तात माघारी परतला, मात्र इतर फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. अभिषेक शर्मा (100 धावा), ऋतुराज गायकवाड (77 धावा) आणि रिंकू सिंग (48 धावा) यांनी केलेल्या संयमी खेळीमुळे टीम इंडियाने झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी 235 धावांचे आव्हान दिले होते.