Worli Hit and Run : आरोपींना राजकीय आश्रय मिळणार नाही अशी आशा करतो – आदित्य ठाकरे

मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. मिंधे गटाचा पालघर जिल्हाप्रमुख आणि उपनेता राजेश शहा यांच्या कारने एका दाम्पत्याला उडवले असून यात यात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा मुलगा फरार झाला आहे.

या घटनेनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांची तसेच या अपघातात जखमी झालेल्या नाखवा यांची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी नाखवा यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन देखील दिले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सुनील शिंदे देखील होते.

”आज वरळी पोलीस ठाण्याला भेट दिली आणि वरळी येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणाचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातला आरोपी शाह याचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे यात मी जाणार नाही. पण मला आशा आहे की पोलीस आरोपीला पकडण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरीत कारवाई करतील. आरोपीला राजकीय आश्रय मिळणार नाही अशी अपेक्षा आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.