आरक्षण बैठकीसाठी राजकारण्यांऐवजी जरांगे पाटील, हाकेंना बोलवा! सर्वमान्य तोडगा काढा, उद्धव ठाकरे यांचं आवाहन

‘शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांना गाडणार’, अशा संकल्पनेतून शिवसेनेचा भव्य शिवसंकल्प मेळावा छत्रपती संभाजीनगरात होत आहे. शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे हा मेळावा सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. वाचा त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

  • माझं मराठा समाजाला, ओबीसी नेत्यांना आणि धनगर समाजातील नेत्यांना आवाहन आहे की एकत्र या. लाखो लोकं विजयोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र येतात, तर आपण आपल्या न्याय्यहक्कांसाठी करोडो लोकं एकत्र येऊन सरकारला गुडघ्यावर आणू शकतो की नाही?
  • पण कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही यांना खेळवताहेत, झुलवताहेत. मराठा आणि ओबीसी एकमेकांच्या उरावर बसवताय, हे पाप करू नका. महाराष्ट्राची ताकद फोडूनच परकीय जिंकले होते.
  • आरक्षणाच्या टक्केवारीची अट ती वाढवणे राज्य सरकार नाही, तर केंद्र सरकारच्या हातात आहे. अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे. सर्वसमाजातील नेत्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन बसा. टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये शिवसेना पाठिंबा देईल. लोकसभेतही पाठिंबा देईल हे जाहीर करतो.
  • दरवेळी जरांगे, तर कधी हाके उपोषणाला बसतात. का जिवाशी खेळ करता? सर्वांना एकत्र बोलवा आणि सर्वमान्य तोडगा काढा. पण नुसतं कोपराला गुळ लावायचा, तारखा देत राहायचं, त्यातनं अनेकजण आरक्षणासाठी, न्याय हक्कांसाठी जीव देत आहेत. पिढ्या संपत आहेत, पण लढा संपत नाहीय.
  • मराठा, ओबीसी, धनगर बांधवांनी एकत्र येऊन तुमची ताकद राज्यकत्यांना कळू द्या. महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणारे मनसुबे उधळून लावली पाहिजे. सर्वमान्य तोडगा काढा, मी पाठिंबा देतो. पण राजकारण्यांना बोलावण्यापेक्षा सर्व समाजातील नेत्यांना, हाकेंना, जरांगे-पाटलांना, धनगर समाजातील लोकांना बोलवून काय पाहिजे विचारून खरंच देऊ शकता हे सांगा त्यांना.
  • तुम्हाला न्याय हक्काचं मिळायला पाहिजेच. पण ते आपापसात भांडून नाही. आपापसात भांडण लावून, आगी लावून हे राज्य करणार असतील, पेटलेल्या घरांवर पोळ्या भाजणार असतील तर पहिले यांची राजकारणातील घरं जाळा. राजकीय वजन कमी करा, त्यांना पाडा.
  • मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आजपर्यंत कमी बैठका झाल्यात का? काय तोडगा काढला? गेल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढला. विधानसभेत मांडला, आम्ही पाठिंबा दिला. पण त्याच्यानंतरही आगी लावण्याचे काम सुरू आहे.
  • छत्रपतींचा महाराष्ट्र जातीपातीत, समाजात भांडणं लावून भाजपवाले मजा मारत असतील तर माझं आवाहन आहे. तुमच्या प्रत्येक मागणीसाठी शिवसेना सोबत आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज स्वत:साठी नाही लढले, तर आपल्यासाठी लढले. हे विसरून लाचारी पत्करणार असाल तर छत्रपती शिवाजी महाराज बोलू नका.
  • तुम्ही मिठी मारू इच्छिता, तर आम्हीही मारू. पण विश्वासघात आणि पाठीत वार कराल तर आम्ही वाघनखं काढून कोथळा बाहेर काढू हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे.
  • केंद्रात सरकार आहे तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. शेती अवजारे, बी, बियाणे, खतांवर जीएसटी लावला जातोय. पिळून काढायचं, हक्काचं द्यायचं नाही आणि उपकार केल्यासारखे तोंडावर फेकायचं. हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रात कधी झाला नव्हता आणि यापुढेही होऊ देणार नाही.
  • मोदी म्हणतात, पाप करा खुशाल रे, हाती माझ्या भाजपा रे! पाप करा आणि भाजपात या. कालच गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकली. म्हणजे पापं करा, पण तुम्ही तिकडे राहिला तर पापी आहात. आमच्या गटारगंगेत डुबकी मारील तर तुम्ही पुण्यावाण आहात.
  • बेकारांचे तांडेच्या तांडे रस्त्यावर फिरताहेत. रोजीरोटीचा पत्ता नाही. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला घेऊन जाताहेत. महाराष्ट्राची वाताहत होत असताना मोदी गॅरंटी धुडकावून लावली, गद्दारांच्या गॅरंटीला बळी पडणार आहात का?
  • महिलांसाठीच्या योजनांचे स्वागत आहे. पण युवकांसाठी काय योजना आहे? शेतकऱ्या आत्महत्या करत आहेत. त्या घरातील वंशाचा दिवा विझल्यानंतर तुमची योजना तो दिवा पेटवू शकणार आहे का?
  • आम्ही केलेल्या कामांचे श्रेय घेताना लाज वाटत नाही. शहराचे आणि जिल्ह्याचे नामकरण केले. पण अजूनही लोकसभा मतदारसंघाचे नामकरण झालेले नाही. आजही औरंगाबाद नाव कायम आहे. मग दोन वर्ष केले काय? थापा मारायच्या आणि पुढे जायचं.
  • आता संभ्रम दूर झाला असून मशाल घेऊन गावागावात जा आणि जिथे यांचे पाप, अन्याय असेल तिथे अशी जागृती करा की त्या मतांच्या माध्यमातून सरकार आणि त्यांची पापं जाळून टाका.
  • मला अभिमान आहे. तुम्ही चोरलेले धनुष्यबाण घेऊनसुद्धा मी बाळासाहेबांचे संस्कार व मशाल घेऊन लढाई लढून आणि जिंकून दाखवली. आता आपल्याला कोणी थांबवू शकत नाही.
  • पवारसाहेब आज आहेत. ते जिकडे उभे तो त्यांचा पक्ष हे जनतेला कळते. पण ग्रामीण भागात आणि शहरातसुद्धा हिंदुह्रदयसम्राटांचा फोटो लावायचा, धनुष्यबाण लावायचा आणि लोकांना फसवून निवडून यायचं.
  • आपल्या बाबतीत खेळ केला तोच राष्ट्रवादीसोबत केला. शरद पवारांचा पक्ष, चिन्हही त्यांना दिले आणि फोटोही वापरायला लागले. पवारांनी कोर्टात जाऊन बंदी केली, आपण का केले नाही. फरक हाच आहे की शिवसेना प्रमुखांचे नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकले आहे. मोदींनी एका पवित्र भावनेने यादीत टाकले असे वाटले, पण नाही तेव्हापासून त्यांची कपट, कारस्थानं सुरू झाली होती. राष्ट्रपुरुषाच्या यादीत नाव टाकल्यावर त्यांच्या फोटोचा वापर कोणीही करू शकते.
  • गद्दारांना लाज वाटायला पाहिजे. चोरून मिळवलेला विजय आहे. पक्ष चोरून त्या नावावर विजय मिळवला. शिवसेना, धनुष्यबाण चोरली. माझ्या वडिलांचा मी काढलेला फोटो लावून, चोरून तुम्ही विजयी झाला आहात. चोरट्यांना तुमचा विजय खरा नाही.
  • गेल्यावेळी मशालीचा प्रचार सुरू करायला उशीर झाला. कारण मशाल ही निशाणी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मिळाली. पहिल्या टप्प्यात आपला उमेदवार नव्हता. दुसऱ्या टप्प्यात यवतमाळचे संजय देशमुख आणि बुलढाण्याच्या नरेंद्र खेडकर यांना मशाल निशाणी मिळाली, त्यानंतर प्रचार सुरू केला.
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी करून दाखवली होती. कदाचित तो राजकीय मूर्खपणा असेल, कारण राजकारणात द्यायचं काही नसतं, नुसतं निवडणुका आल्यावर भुलवायचं असतं. निवडणुका झाल्या, आपल्याला हवं ते साध्य झालं की पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
  • योजनांचा सुकाळ, पण अंमलबजावणीचा दुष्काळ होतोय. अनेक योजना यांच्या पापाचा बुरखा फाटू नये म्हणून मांडल्या आहेत. पापाचा घडा एवढा भरलाय की तो लपवण्यासाठी योजनांचे पांघरून त्यावर घातले जात आहे.
  • शेतकऱ्यांच्या वीजबील माफीची घोषणा झाली, पण नुसते वीज माफ करू नका, तर शेतकऱ्यांची पूर्ण थकबाकी माफ करा आणि मग वीज बील माफ करा. नाहीतर थकबाकी वसूल करणार असल्याचे जाहीर करा. अधिवेशनाचा एक आठवडा बाकी आहे. त्यात त्यांनी वीजबिलासह थकबाकी माफ करण्याचे जाहीर करावे.
  • गेले 10 वर्ष मोदी सरकार सत्तेत आहे. मग 10 वर्षात ज्या योजना जाहीर केल्या त्यापैकी किती अंमलात आणल्या?
  • खास करून माताभगिनींना आपल्याकडे कसे मतदानासाठी आकर्षित करून घेता येईल, हा डाव टाकून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.
  • अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मी हे गळती सरकार असल्याचे म्हटलो. या गळती सरकारच्या निरोपाचं, शेवटचं अधिवेशन आहे. निवडणुकीनंतर हे जुमलेबाज सरकार या गादीवर दिसणार नाही ही शपथ घेऊन मैदानत उतरलं पाहिजे.
  • लाचारी, हरामखोरी आणि गद्दारीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेल, पण शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार ही शपथ घेऊन मैदानात उतरलो आहे.
  • महाराष्ट्र हा साधू-संतांचा, शिवप्रभूंचा, विरांचा, मर्दांचा ही ओळख आपली अशीच ठेवणार की लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी होऊ देणार हे आपण ठरवायचे आहे.
  • महाराष्ट्राची ओळख जगात, इतिहासात काय म्हणून लिहिली जायला पाहिजे ते ठऱवणारी ही निवडणूक आहे.
  • पराभव कसा झाला याचा विचार जरूर करायला पाहिजे. कारण तीन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतायंत. कालची लढाई होती ती देशाची, संविधानाची आणि लोकशाहीची लढाई होती. विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे.
  • निष्ठा महत्त्वाची असते. हारजीत होत असते. निवडणुका येतात, जातात आणि पुन्हा येतात. निवडणुकात हरलो म्हणजे आयुष्य संपत नाही, पण लढण्याची हिम्मत हरलो तर मात्र आयुष्य संपते. मी लढणार आहे, हिंमत हारणार नाही. निवडणूक हरलो तरी पुन्हा जिंकेल या इर्षेने संभाजीनगरमध्ये आलो आहे.
  • आपण अती आत्मविश्वासाने लढलो का? असेलही, पण आपला उमेदवार चंद्रकांत खैरे कित्येक वर्ष तुमच्यासारखे जय-पराजय झाला तरीसुद्धा शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. आमिषं त्यांनाही दाखवली गेली असतील. पण ते निष्ठेने राहिले आणि निष्ठेचा आदर यावेळी उमेदवारी देऊन केला होता.
  • मराठवाड्यातील इतर भगव्याचे पाईक असलेले खासदार निवडून आले, पण हक्काची संभाजीनगरची जागा गमवावी लागली. कारण काहीही असेल, पण हार झालेली आहे.
  • याच संभाजीनगरमध्ये भगव्याची, हिंदुत्वाची बिजं शिवसेनाप्रमुखांनी रोवली आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्र, मराठवाडा पादाक्रांत केला.
  • महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारचं उधळलेलं खेचर… 400 पार करणार होते. त्यांना 40 वरून 9 वरती आणलं आपण. पण विजयात माझ्या हक्काचा संभाजीनगरचा खासदार नाही, हे शल्य माझ्याप्रमाणे तुम्हालाही आणि शिवसेनाप्रमुखांनाही झाले असणार.
  • जे गद्दार इकडनं दुर्दैवाने जिंकलेत, तुम्ही काल जिंकलेला असलात तरी मी संभाजीनगर जिंकल्याशिवाय हटणार नाही. संभाजीनगर जिंकणार म्हणजे जिंकणारच…
  • लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईबाहेर पडताच शिवसेनाप्रमुखांच्या हक्काच्या संभाजीनगरमध्ये आलोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)