
मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी मच्छी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव कारने उडवले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणात आता महत्त्वाची अपडेट आली असून दुचाकीला धडक देणारी कार मिंधे गटाचा उपनेता राजेश शहा यांची असल्याचे उघड झाले आहे.
राजेश शहा हा मिंधे गटाचा पालघर जिल्हाप्रमुख आणि उपनेता आहे. अपघात झाला तेव्हा राजेश शहा हे देखील कारमध्ये होते आणि त्यांचा मुलगा मिहीर ही कार चालवत होता. अपघातात जखमी झालेल्या पीडित व्यक्तीने पोलिसात तसा जबाब दिला आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत मिंधे गटाचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, वरळीतील एट्रिया मॉलजवळ रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगातील बीएमडब्ल्यू कारने ससून डॉकवरून मच्छी खरेदी करून घरी परतत असणाऱ्या कोळी दाम्पत्याच्या दुचाकीला मागून धडक दिली.
वरळी हिट अँड रन – मच्छी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या कोळी दाम्पत्याला कारने चिरडले, महिलेचा मृत्यू; मिंधे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख व उपनेते राजेश शहा, त्यांचा मुलगा मिहीर आणि ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात pic.twitter.com/NnV4NuawLz
— Saamana (@SaamanaOnline) July 7, 2024
अपघातानंतर कोळी दाम्पत्य कारच्या बोनेटवर पडले. पतीने प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारली, मात्र त्यांच्या पत्नीला संधी मिळाली नाही आणि कारचालकाने वेगाने कार दामटवत महिलेला चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. कारखाली चिरडल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
View this post on Instagram
दरम्यान, अपघातानंतर राजेश शहा पिता पुत्राने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कांदिवली एक्सप्रेस वे वरून पोलिसांनी राजेश शहा यांना ताब्यात घेतले. तर त्यांच्या मुलाचा शोध सुरू आहे. पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.