सूरत इमारत दुर्घटना; आतापर्यंत सात जणांचा मृत्यू, NDRF आणि SDRF कडून बचावकार्य सुरूच

गुजरातच्या सूरत शहरात पाच मजली इमारत कोसळल्याने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. एका महिलेला वाचवण्यात यश आले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफकडून बचावकार्य अद्याप सुरूच आहे. आणखी काही लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता आहे.

घटनेची माहिती मिळताच सूरत महापालिकेचे महापौर दक्षेश मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील घटनास्थळी दाखल झाले. सदर इमारतीला महापालिकेकडून याआधीच नोटिस बजावण्यात आली होती. पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

सदर इमारत 2017 मध्ये बांधण्यात आली होती. एकूण 32 फ्लॅट या इमारतीत होते. यापैकी बहुतांश फ्लॅट भाड्याने देण्यात आले होते. ढिगाऱ्याखाली किती कुटुंब अडकली आहेत याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही.