खासगी विकासकांनी निविदेकडे पाठ फिरवल्यामुळे गेल्या वर्षभरापासून एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वांद्रे येथील मुख्यालयाची डागडुजी रखडली होती. अखेर एसआरए मुख्यालयाच्या डागडुजीची जबाबदारी आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
वांद्रे पूर्व येथील अनंत काणेकर मार्गावर एसआरएचे पाच मजली कार्यालय असून या इमारतीचे उद्घाटन 26 ऑगस्ट 2010 रोजी झाले होते. येथे कामानिमित्त दररोज शेकडो रहिवासी आणि विकासकांची रेलचेल असते. अवघ्या चौदा वर्षांत मुख्यालयाच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. ही इमारत बाहेरून दिसायला झकास असली तरी आतून मात्र तिची अवस्था एकदम भकास झाली आहे. जर्जर झालेल्या भिंती, उखडलेले प्लास्टर अशी अवस्था या इमारतीची आहे. पावसाळय़ात तर बेसमेंटमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचते. मुख्यालयाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. अहवालानुसार या इमारतीची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. त्यानुसार गेल्या वर्षी मार्च महिन्यात 11 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती, मात्र एकाही विकासकाने या निविदेला प्रतिसाद दिला नाही.
मुख्यालयाच्या डागडुजीसाठी एसआरएने काढलेल्या निविदेला विकासकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुख्यालयाच्या डागडुजीचे काम आता सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आले आहे. डागडुजीचा खर्च एसआरएच्या तिजोरीतून केला जाणार आहे.
n मिलिंद वाणी, कार्यकारी अभियंते, एसआरए