कमळाबाईची कमाल… वॉशिंग मशीनची धमाल! महापालिकेचा गैरसमज आणि वायकरांवरील डाग… निकळी गया छे!

प्रचंड मोठे घोटाळे करूनही ‘भाजपवासी’ झाल्यानंतर काही दिवसांतच ‘निर्दोष’ ठरण्याचे प्रकार सुरूच असून आता कथित हॉटेल घोटाळय़ातून खासदार रवींद्र वायकर सुटले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने न्यायालयाला सादर केलेल्या ‘क्लोजर रिपोर्ट’मध्ये या गुह्यात काही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. शिवाय या गुह्यामध्ये महापालिकेने गैरसमजातून गुन्हा नोंदवल्याचे स्पष्ट करीत या गुह्यात वायकर यांचा कोणताही सहभाग नसल्याचे सांगत ‘क्लीन चिट’ दिली आहे. यामुळे आता ‘कमळाबाईची कमाल… वॉशिंग मशीनची धमाल’, वायकरांवरील डाग… निकळी गया छे!’, अशीच प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.

पालिकेने उद्यानासाठी राखीव ठेवलेल्या जोगेश्वरी येथील जागेवर सुमारे पाचशे कोटी रुपयांचा भूखंड वायकर यांनी हडप केल्याचा आरोप करीत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर भाजपकडून वायकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत आढळलेल्या माहितीच्या आधारे वायकर यांच्यावर सप्टेंबरमध्ये गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. त्यामुळे वायकर यांनी न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामीनही मिळवला होता. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकर यांची दोन वेळा चौकशीदेखील केली होती. मात्र आता आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात वायकर यांचा कोणताही सहभाग नसल्याचा अहवाल देत त्यांना दोषमुक्त केले आहे. त्यामुळे वायकर यांच्यावर आरोप करणारे भाजपचे किरीट सोमय्या कोणती भूमिका घेणार की  स्वतःदेखील वायकरांना क्लीन चिट देणार अशी चर्चा रंगली आहे.

दाऊदलाच क्लीन चिट द्यायची बाकी आहे

हे सरकार सर्व भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊन आपली ताकद वाढल्याचे दाखवत आहेत. या सर्वांवर कारवाई केली त्यात वायकर आहेत. ते घाबरून पळून गेले. आता त्यांना क्लीन चिट दिली.  मोदी आणि राज्यातल्या सरकारमध्ये आणखी काय होणार? आता फक्त दाऊदलाच क्लीन चिट द्यायची बाकी आहे. हे कायद्याचे राज्य आहे का? आमच्या लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना पक्षात घेतले, आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक त्या दबावाला बळी पडले नाहीत, मात्र काहींचे काळीज उंदराचे आहे. अजित पवार, मुख्यमंत्री याच ईडीच्या कारवाईला घाबरून पळून गेले. भाजपने भीती दाखवायला खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला

भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ

रवींद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट देणे म्हणजे भाजपच्या वॉशिंग मशीनमधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो, पण अनेक उदाहरणे आहेत वायकर त्यातील एक प्रकरण आहे. नरेंद्र मोदी हे देशातील भ्रष्ट लोकांचे सरदार आहेत.

पोपट झाला रे… नो कमेंट्स

पोलिसांनी वायकर यांना निर्दोष असल्याचे सर्टिफिकेट दिल्यानंतर या प्रकरणात वायकर यांच्यावर घोटाळय़ाचे गंभीर आरोप करणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्या यांचा चांगलाच पोपट झाला आहे. पोलिसांच्या भूमिकेमुळे अडचणीत सापडलेल्या सोमय्यांनी आज केवळ ‘नो कमेंट्स’ इतकीच प्रतिक्रिया दिली आहे.

मिंधे गटात गेल्यानंतर दोषमुक्त

जमीन घोटाळय़ात आपला कोणताही सहभाग नसल्याचे सांगत आपल्याविरोधात जाणीवपूर्वक कारस्थान रचले जात असल्याचा आरोप वायकर यांनी केला होता. वायकर यांनी मिंधे गटात प्रवेश करण्यासाठीच त्यांना जमीन घोटाळय़ात अडकवले जात असल्याची चर्चा जोरदार सुरू होती.

अखेर लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या 15 दिवस आधी वायकर यांनी मिंधे गटात प्रवेश केला. यावेळी ‘अशी वेळ कुणावरही येऊ नये’, असे वक्तव्य वायकर यांनी केले होते. मात्र यानंतर वायकर यांची कोणतीही चौकशी झाली नाही, तर आता आर्थिक गुन्हे शाखेनेच त्यांना क्लीन चिट दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वायकरांनीच म्हटले होते… सत्ताधाऱ्यांचे कारस्थान

जोगेश्वरी येथे रवींद्र वायकर यांनी थ्री स्टार हॉटेल उभारणीसाठी पाचशे कोटींचा भूखंड आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लाटल्याचा आरोप करण्यात आला.

पालिकेने याबाबत तक्रारही केली होती. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून वायकर यांची चौकशी वारंवार चौकशी करण्यात आली. चौकशीप्रसंगी खुद्द वायकर यांनी सरकारवर आरोप करताना आपल्याविरोधात कारस्थान असल्याचे म्हटले होते.