पुढील चार महिन्यांत होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. पण या अर्जासोबत पक्ष निधी म्हणून वीस हजार रुपये जमा करण्यास सांगितले आहेत.
काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज मागण्यास सुरवात केली आहे. विधानसभा उमेदवारीचे अर्ज प्रदेश काँग्रेसच्या दादर येथील टिळक भवनात तसेच सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. या अर्जासोबत पक्ष निधी म्हणून सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी 20 हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि महिला इच्छुक उमेदवारांना 10 हजार रुपये द्यावे लागणार आहेत. जे इच्छुक उमेदवार जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर करतील त्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाने 10 ऑगस्टपर्यंत त्यांच्याकडे जमा झालेले अर्ज प्रदेश कार्यालयाला सादर करावेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा अर्ज, सर्व माहिती आणि पक्ष निधीसह 10 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात पाठवावेत, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केले आहे.