मुंबईला पाऊस-पाण्याचे टेन्शन; तलावात खडखडाट, महिनाभरात फक्त पाच टक्के पाणी जमा

या वर्षी जूनच्या सुरुवातीलाच मान्सून डेरेदाखल झाला असला तरी गेल्या महिनाभरात केवळ पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. पश्चिमी वाऱ्याचा वेग अत्यंत कमी असल्याने समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला नसल्याने पाऊस थबकला असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडेही पावसाने पाठ फिरवल्याने पाऊस सुरू झाल्यापासून केवळ पाच टक्केच पाणी जमा झाले आहे. त्यामुळे पावसाने आणखी वेटिंगवर ठेवल्यास ‘राखीव कोटय़ा’वर मदार असलेल्या मुंबईत सध्या असणारी 10 टक्के पाणीकपात वाढण्याचीही भीती आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणीसाठा 10 टक्क्यांवर आल्यानंतर पालिकेने मुंबईत 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 30 मेपासून 5 टक्के तर 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू होणार करण्यात आली आहे. त्यामुळे तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस होण्याची वाट मुंबईकर पाहत आहेत. मात्र गेल्या महिनाभरापूर्वी 9 टक्क्यांवर असलेला पाणीसाठा आतासुद्धा 10.88 टक्क्यांवरच थांबला आहे. तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होत नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

अजून चार दिवसांची प्रतीक्षा

 मान्सून या वर्षी वेळेत सुरू झाला असला तरी सद्यस्थितीत जोरदार पावसासाठी आवश्यक स्थिती निर्माण झालेली नाही. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल. पुढील चार ते पाच दिवसांनंतर जोरदार पाऊस बरसेल. तोपर्यंत कोकणपट्टीसह महाराष्ट्राच्या काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी माहिती मुंबई हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी दिली.

राज्यातील धरणांत फक्त 23 टक्के पाणी

राज्याच्या ग्रामीण भागातही पाण्याची परिस्थिती बिकट आहे. जुलै महिना सुरू झाला तरी धरणांतील पाणीसाठा फक्त 23. 84 टक्के आहे. मराठवाडय़ातल्या धरणांमधील पाणीसाठा अवघा 9.74 टक्के इतका आहे.

राज्यातल्या धरणांतील पाणीसाठा कमी झाल्याने टँकरची संख्या वाढली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 हजार 88 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा होत आहे. राज्यातल्या तब्बल 3 हजार  593 वाडय़ा-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे.

तीन वर्षांची 6 जुलैची स्थिती

2024 – 157449 दशलक्ष लिटर 10.88 टक्के

2023 – 264657 दशलक्ष लिटर 18.29 टक्के

2022 – 232744 दशलक्ष लिटर        16.08 टक्के

उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

मोडक सागर     35272

तानसा   33051

मध्य वैतरणा     32700

भातसा   47853

विहार    10839

तुळशी    2476