तुळजाभवानीला चॉकलेटचा हार घातला! पुजारी मंडळाकडून निषेध

महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीला फुलांचा, सोने -चांदी, हिऱयांचा हार अर्पण करण्यात आल्याचे आतापर्यंत ऐकिवात होते, मात्र शनिवारी भाविकांनी अर्पण केलेला चॉकलेटचा भलामोठ्ठा हार तुळजाभवानीला घालण्यात आला. यामुळे नव्याच वादाला तोंड फुटले असून मंदिरातील पुजारी मंडळाने याचा कडक शब्दांत निषेध केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. कुणी बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी देवीला श्रद्धापूर्वक दागदागिने, वस्त्र अर्पण करतात. भाविकांनी देवीला अर्पण केलेल्या वस्तू परिधान करून देवीचा शृंगारही करण्यात येतो. आज मात्र वेगळीच घटना घडली. एका भाविकाने तुळजाभवानीला चॉकलेटचा भलामोठा हार आणला. भाविकाने अर्पण केलेला हा हार देवीला घालण्यात आला. चॉकलेटच्या या हारावरून मंदिर परिसरात कुजबूज सुरू झाली. त्यावर मंदिर संस्थानच्या परवानगीने हा हार घालण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पुजारी मंडळाने देवीला चॉकलेटचा हार घालण्यास आक्षेप घेतला. देवीचा गाभारा ऐतिहासिक आहे. इथल्या परंपराही सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे नवनवीन प्रथा कशासाठी सुरू करण्यात येत आहेत, असा सवाल पुजारी मंडळाकडून उपस्थित करण्यात आला. मंदिराची स्वतःची नियमावली असताना असे चुकीचे प्रकार घडत असून त्याकडे स्वतः जिल्हाधिकाऱयांनी लक्ष द्यावे, अशी मागणीही पुजारी मंडळाने केली.

देवीला फुलांचा, सोने-चांदीचा, हिऱयाचा हार अर्पण केल्याचे आम्ही पाहतो, परंतु चॉकलेटचा हार घातल्याचे पहिल्यांदाच पाहण्यात आले. तुळजाभवानी मंदिराची एक परंपरा आहे. मंदिराचे पावित्र्य आणि परंपरा जपल्या पाहिजेत, अशी प्रतिक्रिया पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांनी व्यक्त केली.

तुळजाभवानीला चॉकलेटचा हार अर्पण केल्याचे माझ्या कानावर आले. यासंदर्भात मंदिरातील अधिकारी, पुजारी यांच्याकडून माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.

डॉ. सचिन ओंबासे,