मुंबई महानगरपालिकेच्या शाळा सुरू होऊन वीस दिवस उलटले असले तरी अनेक शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. शिवाय पालिकेच्या या विद्यार्थ्यांना मोफत मिळणाऱया 27 वस्तूंचाही पुरवठा झालेला नाही. पालिकेच्या हलगर्जीपणाविरोधात पालक वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळा या वर्षी 13 जूनपासून सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे दिमाखदार स्वागत करण्यात आले. याच वेळी म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय वस्तू मिळतील असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आला होता, मात्र विद्यार्थी अजूनही वेटिंगवरच आहेत. मुंबई महापालिकेच्या सुमारे 1195 शाळा आहेत. या शाळांत शिकणाऱया विद्यार्थ्यांना पालिका गणवेशासह 27 शैक्षणिक वस्तू देते. यासाठी पालिकेकडून दरवर्षी कोटय़वधी रुपयांची तरतूद केली जाते. गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, स्टेशनरी तसेच छत्र्या व रेनकोट आदी शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा सन 2007 पासून मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. पालिका शाळांत शिकणारी बहुतांशी मुले गोरगरीब कुटुंबातून आलेली असल्याने त्यांना या उपक्रमाचा मोठा फायदा होतो.
वर्कऑर्डर उशिरा दिल्यामुळेच विलंब
z पालिका प्रशासनाने यंदाही 27 शालेय वस्तूंची वर्कऑर्डर उशिराने दिल्याने मुलांना पहिल्याच दिवशी गणवेशाविना शाळेत हजर राहावे लागले. अजूनही सुमारे 80 टक्के शाळांत 27 शालेय वस्तूंची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. त्यामुळे 27 शालेय वस्तू उशिराने मिळण्याची प्रथा यंदाही कायम राहिली आहे.
z कार्यादेश दिल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास महापालिकेच्या शाळांमधील मुलांना ऑगस्टपर्यंत अखेपर्यंत या वस्तू मिळण्याची शक्यता आहे. मात्र एक ते दोन वर्षे वगळता प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी या वस्तूंचे वाटप होत आलेले आहे.
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या
z पूर्व प्राथमिक ते इयत्ता 2री ः 2,51,516
z इयत्ता 3री ते 7वी ः 3,82,386
z इयत्ता 8वी ते 10वी ः 1,66,638