ऐकावे ते नवल! तरुण चावल्याने सापाचा मृत्यू

बिहारच्या नवादा जिह्यातील रजौली येथे एका तरुणाने सापाला चावा घेतल्याने यात सापाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आधी साप या तरुणाला चावला. एकदा नव्हे तर दोनदा. साप चावल्याने घाबरलेल्या तरुणाने सापाला तीनदा चावा घेतला. साप दोनदा चावला असूनही तरुण बचावला. परंतु तरुणाच्या चाव्याने सापाचा मात्र मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी वनक्षेत्रातील रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. कामगार काम करून बेस कॅम्पमध्ये झोपले होते. या वेळी कॅम्पसमध्ये साप आला आणि तरुणाला चावा घेतला. तरुणानेही सापाला चावा घेतला. संतोष लोहार असे या तरुणाचे नाव असून तो झारखंडच्या लातेहार जिह्यातील पांडुका येथील रहिवासी आहे. तो म्हणाला, ‘माझ्या गावात एक युक्ती आहे की, जर तुम्हाला सापाने एकदा चावले तर तुम्ही त्याला दोनदा चावा, यामुळे तुमच्या शरीरात सापाचे विष परसण्यापासून रोखता येईल. ही युक्ती लढवूनच मी सापाला चावलो.  सापाला आधी तोंड आणि शेपटीच्या बाजूने धरा आणि मध्यभागी तीन वेळा चावा, असे तो म्हणाला. संतोष लोहारवर उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.