उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये एका तरुणाच्या छातीत लोखंडी सळई आरपार घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कुटुंबीयांना यामुळे चांगलाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे तरुण चालत रुग्णालयात पोहोचला, परंतु त्याची गंभीर अवस्था पाहता त्याला लखनऊमधील रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस करण्यात आली.
सुलतानपूरमधील गुप्तारगंज बाजार परिसरामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजीज अंसारी यांचे जुने झालेले घर नव्याने बांधण्यासाठी तोडण्यात येत होते. परंतु याचवेळी घर तोडत असताना अचानक छत कोसळले आणि अजीज अंसारी यांचा मुलगा शेरू याच्या अंगावर पडले. छत अंगावर पडले आणि छतावरील सळई थेट शेरूच्या छातीत आरपार घुसली. अचानक झालेल्या या सर्व प्रकारामुळे कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला. शेरूला तशाच अवस्थेत तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णाची गंभीर हालत पाहता डॉक्टरांनी त्याला लखनऊमधील रुग्णालयात दाखल करण्याची शिफारस केली.