आगळंवेगळं : अमेरिकेतील नृत्यदर्पण तरुणांचे प्रतिभांगण

>>मेघना साने

I. H. C. A. of NJ तर्फे दरवर्षी ‘नाटय़दर्पण’ व ‘नृत्यदर्पण’ असे दोन समारोह होत असतात. नृत्याची भाषा ही वैश्विक भाषा आहे. त्यामुळे ‘नृत्यदर्पण’ या कार्यक्रमातील नृत्यांचा आस्वाद अमेरिकेतील बहुभाषिक रसिकांना घेता येतो. विशेषत तरुण कलाकारांचा सहभाग असलेल्या या महोत्सवामुळे तरुणांच्या प्रतिभेला व कलेला अजून वाव मिळतो.

हिंदुस्थानातून अमेरिकेत स्थलांतर केलेले हिंदुस्थानी लोक म्हणजे केवळ मराठी भाषिक नाहीत तर गुजराती, पंजाबी, तामीळ, बंगाली असे बहुभाषिक आहेत. त्यांना तिथे एकत्र आणून सामाजिक विषयांवर चर्चा करण्यासाठी I. H. C. A. of NJ (इंडियन हेरिटेज आण्ड कल्चरल असोसिएशन ऑफ न्यू जर्सी) या संस्थेने 2016 साली ‘नाटय़दर्पण’ हा उपक्रम सुरू केला आणि याच उपक्रमातून पुढे ‘नृत्यदर्पण’ या संकल्पनेचा उगम झाला.

‘नाटय़दर्पण’मध्ये नाटक या साहित्यप्रकाराचे विविधरूपी आविष्कार अपेक्षित होते. एकांकिका, एकपात्री, पथनाटय़, नृत्यनाटय़ वगैरे. 2017 मध्ये एक तरुण प्रतिभावान कथ्थक नर्तिका ब्रिंदा गुहा आणि तिच्या अमेरिकन डान्स कंपनीने ‘नारी’ हे नृत्यनाटय़ ‘नाटय़दर्पण’मध्ये सादर केले. त्यांच्या संहितेचा विषय ‘महिला सबलीकरण’ हा होता. गांधारी, कुंती आणि पांचाली या तीन व्यक्तिरेखांना घेऊन हे नृत्यनाटय़ गुंफले होते. त्याच वेळी 2016 मध्ये दिल्लीमध्ये एक बलात्काराची घटना घडली होती. त्या विषयाला जोडून त्यांनी ‘नारी’चे चित्र पूर्ण केले. तरुण मुलामुलींची प्रतिभा पाहून आयोजक थक्क झाले. नृत्यातून सामाजिक संकल्पना व्यक्त केल्या जाऊ शकतात हे आयोजकांच्या लक्षात आले.

2018 मध्येदेखील ‘नाटय़दर्पण’च्या उपक्रमात तरुणांकडून असाच प्रयत्न झाला. ‘रास्तार कोथा’ या शीर्षकाखाली सादर झालेले नृत्यनाटय़ म्हणजे रस्त्यात घडणाऱया छोटय़ा-छोटय़ा कथा होत्या. सादर करणारी इशिता मिली भट्टाचार्य ही कलाकार भरतनाटय़मचे अरंगेत्रम केलेली होती. हिप हॉप हा डान्सही शिकून घेतला होता. हिप हॉप डान्सशैलीत तिने ‘रास्तार कोथा’ हा डान्स ड्रामा बसवला होता.

तरुण कलाकारांनी सादर केलेल्या या उच्च दर्जाच्या नृत्य कलाकृती पाहून ‘नाटय़दर्पण’चे आयोजक डॉ. अशोक चौधरी आणि त्यांच्या संस्थेच्या कार्यकारिणीने तरुणांच्या प्रतिभेला व कलेला अजून वाव देण्यासाठी ‘नृत्यदर्पण महोत्सव’ हा उपक्रमच करण्याचे ठरविले. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन येथील Battery Dance Festival चे आयोजक आणि सुप्रसिद्ध नर्तक व नृत्यदिग्दर्शक जोनाथन होलँडर यांच्यामुळे डॉ. अशोक चौधरी यांची माया कुलकर्णी या नृत्यक्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध व्यक्तीशी ओळख झाली. ‘शिल्पनटनम’ हा नृत्यप्रकार माया कुलकर्णी यांनी पुनरुज्जीवित करून विकसित केला आहे. प्राचीन मंदिरांतील शिल्पांच्या नृत्यमुद्रा, नृत्य आणि अभिजात नाटय़शास्त्र यांचा मिलाफ करून तयार केलेली ही शैली आहे. डॉ. अशोक चौधरी यांनी मायाताईंना ‘नृत्यदर्पण’ची संकल्पना सांगितल्यावर त्यांनी आनंदाने या उपक्रमासाठी क्युरेटर म्हणून काम करण्याचे मान्य केले. तसेच प्रसिद्ध बॅले डान्सर कॅरेन ग्रीनस्पॅन यांनीही क्युरेटर म्हणून सहकार्य करण्याचे मान्य केले.

न्यूयॉर्कस्थित कॅरेन यांचा जगातील विविध नृत्यशैलींचा अभ्यास आहे. त्या नृत्य पत्रकार आहेत, तसेच नृत्य विषयाला वाहिलेल्या अनेक मासिकांमधून त्या नियमितपणे लेखन करीत असतात. डॉ. अशोक चौधरी म्हणतात, भरतनाटय़म किंवा इतर शास्त्राrय नृत्यांमधून काही ठरावीक विषय नेहमी घेतले जातात. शिवस्तुती, द्रौपदी वस्त्रहरण, गणेशस्तुती किंवा दशावतार वगैरे, पण आम्हाला तसे नको होते. या महोत्सवातून अगदी नवीन तत्कालिक सामाजिक विषय येतील अशी नृत्यनाटय़े निवडायची होती. त्यासाठी तज्ञांचा कस लागला आणि अगदी युनिक अशी नृत्ये सादर झाली. ‘नृत्यदर्पण’ हा प्लॅटफॉर्म शास्त्राrय नृत्य तसेच कंटेम्पररी डान्ससाठीही होता.

2022 आणि 2024 मध्ये झालेल्या ‘नृत्यदर्पण’ महोत्सवात वेगवेगळे विषय वेगवेगळ्या नृत्यप्रकारांच्या माध्यमातून सादर झाले. एका मुलीने महिला सबलीकरण या विषयावर `No Man` नावाच्या संहितेवर कंटेम्पररी नृत्य सादर केले, तर हान्स ख्रिश्चन अँडरसन यांच्या ग्रुपने `Black Swan` ही कथा मणिपुरी नृत्यशैलीत सादर केली. माया कुलकर्णी यांनी कोरिओग्राफ केलेल्या `Impossible Romance` या नृत्यामध्ये धरतीवरचा मोर आकाशातील मेघाला म्हणतो, तू तेथील एका सुंदर मुलीला पाहिलं आहेस का? मेघ इकडेतिकडे पाहतो तर त्याला विद्युल्लतेचे नर्तन दिसते. हीच ती सुंदर मुलगी जिच्याकडे पाहून मेघ पाघळतो आणि विलीन होतो. पाऊस पडतो! ही संपूर्ण कथा नृत्यातून कौस्तुवी सरकार या कसलेल्या नर्तिकेने सादर केली. तर शीला मेहता यांच्या समूहाने महाभारतातल्या शिखंडीची कथा नृत्यातून सादर केली. हे नृत्य ‘चरणी’ परंपरेतील ‘कथाकार’ अंगाने सादर केले गेले. आत्म्याला लिंगभाव नसतो हा सामाजिक संदेश या नृत्यनाटय़ातून पुढे आणला गेला.

2024 सालच्या ‘नृत्यदर्पण’ समारोहात चार विविध समूह वेगवेगळी संहिता घेऊन सहभागी झाले होते. आता I. H. C. A. of NJ तर्फे दरवर्षी ‘नाटय़दर्पण’ व ‘नृत्यदर्पण’ असे दोन समारोह होत असतात. गेली दोन वर्षे न्यू जर्सीत सादर झालेला हा महोत्सव रसिकांच्या प्रतिसादाने अतिशय गाजला. त्यामुळे आता न्यूयॉर्क शहरातील रसिकांनीसुद्धा आयोजकांना आमंत्रण दिले आहे. ‘नृत्यदर्पण’ महोत्सवाचा दर्जा, तसेच त्यात आविष्कृत होणाऱया हिंदुस्थान व पाश्चात्य नृत्यपरंपरांमुळे कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया, न्यूयॉर्क यांनीसुद्धा ‘नृत्यदर्पण’ महोत्सवाला पाठिंबा दिला आहे आणि आयोजनात सहभागी झाले आहेत.

[email protected]