साहित्य जगत : आहे हे असं आहे

>>रविप्रकाश कुलकर्णी

वय ही गोष्ट वाढत जाणारी आहे. त्याला विशेष काही करायला लागत नाही. त्यामुळे विनय हर्डीकर यांची पंचाहत्तरी साजरी होत आहे हे कळल्यावर फारसं आश्चर्य वाटलं नाही. कदाचित त्यांना जाणवून देण्यासाठी तर हा घाट घातला नसेल ना, असंही मनात आलं. अर्थात कुठल्याही गोष्टीला बधणारा हा माणूस नाही हेदेखील तितकंच खरं. यानिमित्ताने साधना प्रकाशनतर्फे विनय हर्डीकरांचं पहिलं पुस्तक ‘जनांचा प्रवाहो चालिला’ याची तिसरी आवृत्ती आणि त्यांचं नवं कोरं पुस्तक ‘एक्स्प्रेस पुराण माझी शोध पत्रकारिता’ याचं प्रकाशन झालं.

‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पुस्तकामुळे ‘सांप्रत हा कोण अवतार’ या चालीवर विनय हर्डीकर हे नाव चर्चेत येऊ लागलं. पुढे या पुस्तकाला सरकारी पुरस्कार मिळाला आणि नंतर तो नाकारला गेला. यामुळे तर विनय हर्डीकर या नावाला वलय लाभलं. ‘जनांचा प्रवाहो चालिला’मधल्या दोन-चार गोष्टी आजही ठळकपणे आठवतात. पहिल्या प्रकरणात पहिलंच वाक्य आहे, ‘1975 च्या जून महिन्यात मीसुद्धा एक सामान्य हिंदुस्थानी नागरिकच होतो.’ अर्थात यामागे कुविख्यात आणीबाणीचा संदर्भ आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे आणीबाणीबाबत आमचे लेखक कसा विचार करत होते याबाबत हर्डीकरांनी त्यांची नावं देऊन स्पष्ट केलं होतं. पण याबाबत त्यांनी रा. भा. पाटणकर यांची समस्या मांडली होती. आणीबाणी काळातच त्यांच्या सौंदर्यशास्त्रावरील पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. सरकारचा निषेध म्हणून साहित्यकांनी त्याला मिळालेले पुरस्कार परत करावे असा विचार आधी दुर्गा भागवतांनी मांडला आणि काहींनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला होता. रा. भा. पाटणकर यांचं म्हणणं होतं, ‘‘मी जर पारितोषिक परत केलं नाही तर माझं काय चुकलं? लेखन स्वातंत्र्याच्या विरुद्ध मी गेलो असा त्याचा अर्थ कसा निघू शकतो?’’

अशीच लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे पुस्तकाच्या नावाच्या बाबतीत त्यांनी केलेला खुलासा. समर्थ रामदासांच्या ‘संभाजीस पत्र’मध्ये ओवी आहे, ‘जनाचा प्रवाहो चालिला’, मात्र पुस्तकाच्या शीर्षकांसाठी विनय हर्डीकर यांनी जनांचा केलं. असं का? तर हर्डीकर सांगतात, “अनुस्वार मी माझ्या आवडीनुसार, नादासाठी दिला आहे. ओवीच्या अर्थामध्ये काही बदल सुचवण्याचा हेतू नाही. मूळ अर्थच मनात आहे.’’ हे सांगायचं तात्पर्य की, एकेका अनुस्वारासाठी हा लेखक जागरूक आणि सावधही आहे व अशा नादासाठी तो काहीही करू शकतो. शिवाय त्यासाठी त्याची जी सफाई असते, ती बिनतोड असते. शिक्षक, प्राध्यापक, लेखक, समीक्षक, राजकीय-सामाजिक कार्यकर्ते असं बऱयाच काही क्षेत्रांत वावरणाऱया हर्डीकरांचं वैशिष्टय़ म्हणजे ते सर्व गोष्टी मुळापासून तपासतात. त्यांचे म्हणून निष्कर्ष असतात ते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सांगून मोकळे होतात.

श्रद्धांजली, कारूण्योपनिषद्, विठोबाच्या अंगी, देवाचे लाडके, जन ठायीं ठायी तुंबला या संग्रहातील लेख त्याचे साक्षी आहेत. यातील शेवटच्या संग्रहाच्या मुखपृष्ठावर समर्थांची ओवी उधृत केली आहे…   जनांचा प्रवाहो चालिला,

       म्हणिजे कार्यभाग आटोपला

       जन ठायीं ठायीं तुंबला, म्हणिजे खोटें

म्हणजे विनय हर्डीकर आपलं नातं कोणाशी आहे हेच जणू सांगतात. हे हर्डीकर कसे आहेत याचं एक उदाहरण सांगतो. त्यांचा ‘माणूस’मधला एक लेख पु. ल. देशपांडे यांना खूप आवडला. ही खुशी त्यांनी संपादक श्री. ग. माजगावकर यांना फोन करून कळवली आणि म्हटलं, “हा कोण नवा मुलगा आहे, माझ्याकडे घेऊन ये.’’ माजगावकरांनी हे हर्डीकर यांना सांगितलं, “आपल्याला पुलंकडे जायचं आहे.’’

तेव्हा हर्डीकर माजगावकरांना  यांना म्हणाले, “मग पुलंनी मला भेटायला यायचं की मीच त्यांच्याकडे जायचं?’’

तर विनय हर्डीकर नावाचा लेखक आहे हा असा आहे रोखठोक! किंबहुना हीच त्याची खासियत आहे. जी अनेकांना आवडते आणि अर्थात काही जणांना अजिबात आवडत नाहीहेही तितकंच खरं. पण आवडणाऱयांची संख्या जास्त आहे हे त्यांच्या सत्काराला आलेल्या चाहत्यांवरून दिसून आलं. या कार्यक्रमाचे वेगळेपण सांगायचं तर सत्कारमूर्तीला हार, तुरे, शाल, श्रीफळ वगैरे देण्याला फाटा देऊन टाकला होता. ही सूचना हर्डीकरांचीच! प्रकाशन वगैरे झाल्यानंतर त्यांची आनंद आगाशे आणि राजन गवस यांनी मुलाखत घेतली. अर्थात इथे हर्डीकर यांनी चौफेर टोलेबाजी केली हे वेगळं सांगायला नकोच. हा सगळा खेळ सुदैवाने साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांनी व्हॉट्सअॅपवर टाकलेला आहे. जिज्ञासूंना तो पाहता येईल. नव्हे तो पाहावा असा आहे.