Lal Krishna Advani health update – लालकृष्ण आडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तब्येत स्थिर

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान, भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत स्थिर असून ते घरी आराम करत आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

बुधवारी रात्री 9च्या सुमारास तब्येत बिघडल्याने 96 वर्षीय आडवाणी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर रुग्णालयाने बुलेटीन जारी करत त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती दिली. न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. योग्य उपचारानंतर गुरुवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

याआधी 7 दिवसांपूर्वी 26 जून रोजीही तब्येत बिघडल्याने आडवाणी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे यूरॉलॉजी डिपार्टमेंटचे डॉ. अमलेश सेठ यांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार केले. यादरम्यान आडवाणी यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

भारतरत्नाने सन्मान

दरम्यान, लालकृष्ण आडवाणी यांचा याच वर्षी देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्नने सन्मान करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानित केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते.