>>डॉ. धीरज कुलकर्णी
टिकलीएवढं तळं…
कुंकवाएवढा समुद्र नाही. टिकलीएवढं तळंच…
तेवढंच पुरेसं आहे तिला
तिच्या भावविश्वाला…
किती असते एखाद्या सामान्य, संसारी स्त्रीचं भावविश्व? काय हवं असतं तिला? काय नको असतं? तिला काय आवडतं, आवडत नाही? तिच्या अनुभवांचे संचित हे त्या तळ्यातले पाणी.
या आधुनिक काळात स्त्रीचा प्रवास कुठून कुठे, तर कुंकवापासून टिकलीपर्यंत. बंधनं, परंपरा, जबाबदाऱया यांचा जाच सर्वाधिक तिलाच. त्यातून ती स्त्री कलासक्त, सुशिक्षित, साहित्यप्रेमी, सौंदर्यदृष्टी जपणारी असेल तर या परंपरावादी, भौतिक जगाने केलेल्या जखमा खोल खोल जातात.
अपर्णाचे केस अगदी लांबसडक, पायापर्यंत येणारे. केशव म्हणायचा, “या केसांच्या धबधब्याला गिरसप्पा म्हणावं की नायगारा?’’
सासूबाई म्हणतात, “कसे सपाटेबंद आहेत केस!’’
दोन्हीकडून कौतुकच, पण कुठलं कौतुक जास्त हवंसं वाटतं अपर्णाला? पुस्तकात रमवणारं, कविता करणारं, साहित्य, कला, चित्र यांच्या विश्वातलं की मंगळागौर, नहाण आणि तत्सम परंपरा आणि कर्मकांडात गुदमरून टाकणारं?
नवरा श्री, प्रेम करत नाही असं नाही, पण त्याच्या प्रेमाची तऱहा निराळी. उच्च मध्यमवर्गीय पुरुषी चौकटीतली. स्त्रीला पुरुष आवडतो म्हणजे नक्की काय असतं?
निर्मला देशपांडे यांच्या ‘टिकलीएवढं तळं’ या छोटेखानी कादंबरीत नव्या युगातील सुशिक्षित स्त्रीला मिळालेलं आत्मभान आणि परंपरावादी समाजात वावरताना पदोपदी करावा लागलेला स्त्रीचा संघर्ष याचं अस्वस्थ करणारं चित्रण आहे.
अपर्णा ही मध्यमवर्गीय माहेरातून एका श्रीमंत सासरी येते. तिचा नवरा सुशिक्षित, मोठय़ा पदावर काम करणारा. तिची ओळख कुटुंबाचे मित्र, निशिकांत आणि सुधाशी होते. कवयित्री सुरेखा त्याच ओळखीतून भेटते.
अपर्णाच्या आसपास असणाऱया स्त्रिया-पुरुष यांचे ती निरीक्षण करतेय. शेजारी असलेल्या बंगाली कुटुंबातील भानुदी, शोबित्री या परंपरावादी स्त्रिया, त्यांची मनमोकळी मुलगी, लोचनाला सांभाळण्यासाठी ठेवलेली रामप्यारी ही दाई. सगळ्या विविध रूपांच्या. पण कुठेतरी जखडल्यासारख्या, सुटकेसाठी धडपडणाऱया. रामप्यारी नवऱयाला सोडून आलीय. का ते तिलाच माहीत. अवाक्षर बोलत नाही त्याबद्दल.
कवयित्री सुरेखाच्या कुटुंबाला पडत्या काळात निशिकांतने हात दिला. आता ते कुटुंब सावरलंय, पण थोरली म्हणून सगळी जबाबदारी सुरेखावर येऊन पडली. तिचं लग्न राहून गेलं.
लग्नापूर्वी अपर्णाला केशवबाबत आकर्षण वाटत होतं, पण ते प्रेम अबोल राहिलं. काही कळण्याअगोदर अपर्णाचं लग्न श्रीसोबत झालं. अपर्णा केशवबाबत श्रीला स्पष्ट सांगते. श्रीही ते मोकळेपणाने स्वीकारतो. निशिकांत अपर्णावर प्रेम करतो. अपर्णालाही ते माहीत आहे. तिला निशिकांतबद्दल आकर्षण आहे, पण ते शारीरिक स्वरूपाचं नाही, तर बौद्धिक पातळीवर. एकमेकांच्या आवडीनिवडी जुळल्याने तिला निशिकांत आवडतो. निशिकांत मात्र या जवळिकीचा गैरफायदा घेऊन अपर्णाकडून नको ती मागणी करतो.
अपर्णा कविमनाची हळवी स्त्री आहे. मात्र ती कमकुवत नाही, तर खंबीर आहे. शिक्षणाने तिच्यातील आत्मभान जागृत झालेलं आहे. ती चुकीच्या गोष्टींना ठाम नकार देते. श्री हा कलाप्रेमी नसला तरी जोडीदार म्हणून आदर्श आहे. अपर्णाची तो सर्वतोपरी काळजी घेतो. अपर्णा त्याच्याशी प्रतारणा करू शकत नाही. निशिकांतच्या आकस्मिक मृत्यूनंतर अपर्णाच्या आयुष्यात एक उदास पोकळी निर्माण होते, पण तरीही तिचा प्रवास ती ठामपणे करायचं ठरवते.
लेखिका सर्व पात्रांचे, घटनांचे चित्रण अपर्णाला केंद्रस्थानी ठेवून करते आहे. त्यामुळे स्त्रीवादी कथेला पोषक अशी रचना पाहायला मिळते. मात्र कुठेही स्त्री कशी ‘बिचारी’ आणि पुरुष कसे ‘कठोर, खलनायक’ असा आवेश नाही. घडणाऱया घटना या कथेच्या प्रवाहानुसार घडतात. कुणालाही आरोपीच्या पिंजऱयात उभे न करता.
स्त्रीच्या मनाची नाजूक आंदोलने इथे तरलतेने हाताळली आहेत. लेखिकेने प्रसंग, पात्रे, प्रतीके यांचा बडिवार न करता सूक्ष्मपणे नायिकेचा प्रवास दाखवला आहे. कादंबरी या आकृतिबंधात हे महत्त्वाचं आहे. अन्यथा बटबटीतपणाचा दोष येऊ शकतो.
गेल्या शतकाच्या मध्यकाळातील सर्वच हिंदुस्थानी स्त्रियांचा व एकूण मध्यमवर्गीय समाज जीवनाचा आलेख मांडणारी ही कादंबरी अवश्य वाचनीय आहे.
[email protected]
लेखिका ः निर्मला देशपांडे
प्रकाशक ः पॉप्युलर प्रकाशन 1980