लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात आक्रमक भाषण करत सत्ताधारी भाजपच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढली होती. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि यूपीत जसा पराभव झाला तसाच पराभव यावेळी गुजरातमध्येही करणार लिहून घ्या, असे राहुल गांधी यांनी ठणकावले होते. राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाला आणि तोडफोड करण्यात आली. यानंतर राहुल गांधी यांनी गुजरातचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज अहमदाबादमध्ये दाखल झाले. यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केले.
राजकोटमधील गेमझोनला लागलेली भीषण आग, मोरबी पूल आणि सूरतमधील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. यानंतर राहुल गांधी अहमदाबादमध्ये एका सभेत कर्याकर्त्यांना संबोधित केले. आपण गुजरातमध्ये भाजपचा पराभव करू आणि काँग्रेसचा एकही कार्यकर्ता कोणाला घाबरणार नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. भीती आपल्याला नाही, त्यांना आहे. आपलं कार्यालय जसं त्यांनी तोडलं तसं गुजरातमध्ये त्यांचं सरकार तोडू, असा निर्धार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
भाजपने आपल्या कार्यालयाची तोडफोड केली. कार्यकर्त्यांवर हल्ला केला. आता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही आणि घाबरवायचंही नाही. भाजपने आपले कार्यालय फोडून आपल्याला आव्हान दिले आहे. आता गुजरातच्या निवडणुकीत आपण सर्व मिळून भाजपचा पराभव करू हे आपले आव्हान आहे, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी हे विधान करताच सभेत उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या. आताच लिहून घ्या, काँग्रेस पार्टी गुजरातची निवडणूक लढणार. आणि अयोध्येत नरेंद्र मोदी आणि भाजपचा पराभव केला तसाच पराभव गुजरातमध्ये आपण भाजपचा करणार. आपले बब्बर शेर कार्यकर्ते आणि पक्षाचे नेते भाजपचा पराभव करतील, असा विश्वास राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपने राम मंदिराचे उद्घाटन केले. राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेवेळी अदानी दिसले, अंबानी दिसले पण एकही गरीब व्यक्ती तिथे दिसला नाही. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. अयोध्येत ‘इंडिया’ आघाडीचाच विजय होणार, हे आपल्या उमेदवाराने आधीच सांगितले होते. कारण अयोध्येत क्लिनअपसाठी अनेकांच्या जमिनी हिसकावल्या. दुकानं आणि घरं तोडली. आजपर्यंत त्यांना नुकसान भरभाई दिली नाही. अयोध्येत विमानतळ बनले, शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. पण अजूनही त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. आणि राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमात अयोध्येतून एकही प्रतिनिधी नव्हता, यामुळे जनतेता प्रचंड रोष होता, असे विजयापूर्वीच उमेदवाराने सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले.
नरेंद्र मोदींना वाराणसीतून नव्हे अयोध्येतून निवडणूक लढवायची होती. त्यासाठी तीन वेळा सर्व्हे करण्यात आला. पण तुम्ही अयोध्येतून निवडणूक लढलात तर पराभूत व्हाल, असे सर्वेक्षण करणाऱ्यांनी नरेंद्र मोदींना सांगितले. लढले तर राजकीय करिअर अयोध्येतच संपेल. त्यामुळे अध्योतून लढू नका, असे नरेंद्र मोदी यांना सांगण्यात आले होते, असे राहुल गांधी म्हणाले.