“लोकं विसरलेली; हार्दिकही माणूस आहे, त्यालाही…”, विश्वविजेत्या भावासाठी कृणाल पंड्याची भावूक पोस्ट

हिंदुस्थानी संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकून कोट्यवधी देशवासियांची इच्छा पूर्ण केली. वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या अंतिम लढतीत हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. हिंदुस्थानच्या या विजयामध्ये अष्टपैलू हार्दिक पंड्या याचेही मोलाचे योगदान असून अंतिम लढतीत त्याने मोक्याच्या क्षण हेनरिक क्लासन आणि डेव्हिड मिलर यांची विकेट काढली. यामुळे हिंदुस्थानला 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरता आले. मुंबईतील वानखेडे मैदानावर या विश्वविजेत्या खेळाडूंचा सन्मानही करण्यात आला. मात्र याच मैदानावर काही महिन्यांपूर्वी हार्दिकला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्याची हुर्या उडवण्यात आली होती. याचाच दाखला देत कृणाल पंड्याने इन्स्टाग्रामवर एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला हटवत हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची धुरा दिली. त्यामुळे हार्दिकला चौफेर ट्रोलिंगचा सामना करावा. सोशल मीडियापासून मैदानापर्यंत तो ट्रोल झाला. लोकं त्याची हुर्या उडवू लागले होते. मात्र वर्ल्डकप जिंकल्यानंतर वानखेडेवर याच हार्दिकसाठी लोकांनी घोषणाबाजी करत त्याला पाठींबा दिला. मात्र गेल्या काही महिन्यात त्याच्यासोबत घडलेल्या घटनांचा दाखला देत कृणालने मोठी पोस्ट लिहिली आहे.

हार्दिक आणि मी प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात करून जवळपास एक दशक झाले. गेल्या काही दिवस स्वप्नवत होते. जे स्वप्न आपण पाहिले ते सत्यात उतरले. प्रत्येक देशवासियांप्रमाणे मीही या क्षणाचा आनंद लूटत आहे. हार्दिककडे पाहून मी भावूक झालोय. गेले 6 महिने त्याच्यासाठी संघर्षमय होते. त्याच्यासोबत अत्यंत वाईट झाले. त्याची चूक नव्हती, तो त्याचे काम करत होता. एक क्रिकेटपटू आणि माणूस म्हणूनही मला खुप वाईट वाटले. त्याने खुप काही सहन केले. लोकं विसरलेली, तो देखील एक माणूस आहे, असे कृणालने पोस्टमध्ये म्हटले.

मैदानात, सोशल मीडियावर त्याची हुर्या उडवण्यात आली. पण त्याने या काळाचाही हसऱ्या चेहऱ्याने सामना केला. त्याच्याठी ते किती कठीण होते याची मला कल्पना आहे. तो मेहनत करत राहिला. हिंदुस्थानला वर्ल्डकप जिंकून देण्यासाठी जे योगदान द्यायचे होते त्यासाठी त्याने प्रचंड कष्ट घेतले. सहाव्या वर्षापासून तो क्रिकेट खेळत असून हिंदुस्थानसाठी खेळायचे आणि वर्ल्डकप जिंकालचा हे त्याचे स्वप्न होते. आत हे स्वप्न सत्यात उतरले आहे, असेही कृणालने म्हटले.


यावेळी कृणालने हार्दिकवर टीका करणाऱ्यांनाही उत्तर दिले. हार्दिकने खुप कमी काळात यशाची शिखरं गाठली. हिंदुस्थानी संघाप्रति त्याची निष्ठा अटळ आहे. देश हे सर्वोच्च प्राधान्य असून पुढेही राहील. त्याला ट्रोलिंग, टीकेचा सामना करावा लागला. लोकं वाट्टेल ते बोलत होती. पण त्याने एकाग्रता सोडली नाही आणि खेळातून उत्तर दिले. बडोदाच्या एका मुलासाठी देशाला वर्ल्डकप जिंकून देता येण्यासारखा आनंद नाही. हार्दिक मला तुझा प्रचंड अभिमान असून सगळ्यांचे तुझ्यावर प्रेम आहे. तू त्या प्रेमाचा हकदार आहेत. तुझ्याप्रति प्रचंड आदर वाटतो बच्चू, असे शेवटी कृणालने म्हटले.