चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील गोळीबार प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. सर्वांचे इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी नऊ पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत. आता हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे समजते. गोळी झाडणारा अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही, कोळसा चोरीतून गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
पाठीमागून आला आणि गोळीबार केला; चंद्रपुरात पूर्व वैमनस्यातून हल्ला pic.twitter.com/gJrlbdPbic
— Saamana (@SaamanaOnline) July 4, 2024
गुरुवारी भरदुपारी एका अज्ञात इसमाने मनसे कामगारसेनेचा जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडली. गोळी पाठीत घुसल्याने अंधेवार जखमी झाले होते. चंद्रपूर शहर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा करीत सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. त्या आधारावर शहर पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम तसेच आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वातील पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले आहेत. तरी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याची माहिती आहे. संशयितांची नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत.