ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत परत एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या प्रकरणामुळे ठाणे शहर हादरले आहे. कळवा रुग्णालयात जून महिन्यात 512 महिला प्रसूतीसाठी आल्या होत्या. त्यापैकी 294 गर्भवतींचे सिझर करण्यात आले, तर 90बालकांचा जन्म अतिदक्षता विभागात झाला होता. मात्र यापैकी 21 नवजात बाळांचा मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या वर्षी एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला असताना आता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात जून महिन्यामध्ये 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराच्या चांगल्या सोयीसुविधा असल्यामुळे जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातून रुग्ण येतात. अशातच जून महिन्यात बाळंतपणासाठीदेखील गर्भवती महिला मोठ्या संख्येने आल्या होत्या. दरम्यान, या प्रसूती झालेल्या महिलांच्या 90 नवजात बालकांचे वजन 1 किलोपेक्षा कमी होते. तसेच मृत्यू झालेल्या 21 बालकांपैकी 19 बालक हे शहराबाहेरील होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली.
…म्हणून उपचार मिळत नाहीत
खासगी रुग्णालयात बाळाला वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर काही बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काही बालके गंभीर अवस्थेत आल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणले जाते, तर ग्रामीण, दुर्गम भागातील गर्भवती महिलेचे बाळंतपण एकदम जोखमीचे असल्यावर शेवटच्या घटकेला रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने वेळीच उपचार करता येत नाही.
अहवाल तयार करण्याचे आदेश
बहुतेक मुले अशी आहेत ज्यांना गोल्डन मिनिट, म्हणजे जन्मानंतर लगेचच उपचार मिळाले नाहीत. मुलांना आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत घाई केली जाते. त्यामुळे मौल्यवान वेळ आधीच वाया जातो. दरम्यान, याप्रकरणी अहवाल तयार करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.