अकरावीसाठी 15 हजार नवे अर्ज; दुसऱ्या फेरीसाठी आज शेवटचा दिवस

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी 10 जुलै रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाच्या पहिल्या भागात दुरुस्ती करण्याबरोबरच पसंतीक्रम भरण्यासाठी आणि ज्यांनी अर्जच अद्याप भरला नाही अशा विद्यार्थ्यांना या यादीत समावेश होण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. 6 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत प्रवेश अर्ज करता येणार आहे. या यादीत 15 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज नव्याने केले आहेत.

अकरावीच्या पहिल्या यादीत 2 लाख 28 हजार 312 विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले होते. त्यापैकी 1 लाख 30 हजार 645 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले होते. त्यापैकी महाविद्यालयात जाऊन 57 हजार 450 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्यापैकी प्रवेश न मिळालेले 97 हजार 662 विद्यार्थी आहेत. या यादीत सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांनी नव्याने अर्ज केले आहेत. अर्ज करण्याचा आणि पसंतीक्रम बदलण्याचा शनिवार शेवटचा दिवस आहे.

दुसरी गुणवत्ता यादी 10 जुलैला
7 ते 9 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांचे परीक्षण आणि 10 जुलैला सकाळी 10 वाजता गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. गुणवत्ता यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 10 ते 12 जुलै दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. तर 12 जुलैलाच कनिष्ठ महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची स्थिती पोर्टलवर दाखविता येईल.