महात्मा गांधी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना, बेघर करण्याचा डाव शिवसेनेने हाणून पाडला

परळ येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाच्या कर्मचाऱयांना ऐन पावसाळ्यात निवासस्थान सोडण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या. त्याविरोधात शिवसेनेने जोरदार आवाज उठवला. त्याची आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. रुग्णालय परिसरात बांधलेल्या नव्या इमारतीत या सर्वांची राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

महात्मा गांधी स्मारक रुग्णालयाच्या अधिकाऱयांनी मनमानी कारभाराबाबत तसेच अन्य मुद्दय़ांवर शिवसेना विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन आज विधानभवनातील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला ईएसआयसीचे आयुक्त तसेच संबंधित सर्व अधिकारी आणि महाराष्ट्राचे आरोग्य सचिव, महात्मा गांधी रुग्णालय कामगार सेनेचे पदाधिकारी सरचिटणीस अनिल कोकीळ, शंकर लांबडे, सचिन जाधव, चंद्रकांत काळे उपस्थित होते.

– रुग्णालय परिसरामध्ये उपलब्ध असलेल्या हॉस्टेलच्या जागेत कर्मचाऱयांना राहण्याची व्यवस्था करून देण्यात यावी आणि तातडीने आजच्या आज सदर ठिकाणी पाहणी करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करावा,असे आदेश त्यांनी दिले. आरोग्यमंत्र्यांच्या आदेशानुसार लगेचच रुग्णालयाच्या परिसरातील नवीन इमारतीमधील उपलब्ध जागेची पाहणी अधिकाऱयांनी केली. मंगळवार 9 जुलै रोजी पुन्हा याविषयी आरोग्यमंत्र्यांच्या दालनात बैठक होईल, असे सांगितले.

– बैठकीत रुग्णालय प्रशासनाच्या गैरकारभाराबाबत अजय चौधरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पावसाळ्यात या कामगारांना बेघर होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्याबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. इमारतीवर दोन माळ्यांचे अनधिकृत बांधकाम केले गेले आहे याकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले.