विधान परिषद निवडणूक अटळ; 11 जागांसाठी 12 उमेदवार

11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक आता अटळ झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कोणीही माघार न घेतल्याने निवडणुकीतील चुरस आणखीनच वाढली आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिंधे गट आणि अजित पवार गटाला पक्ष फुटीची भीती सतावू लागली आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 14 अर्ज दाखल झाले होते. त्यातील दोन अपक्ष उमेदवारांनी कालच आपले अर्ज मागे घेतल्याने 12 उमेदवार शिल्लक होते. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. 12पैकी कुणीतरी अर्ज मागे घेईल आणि निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा शेवटपर्यंत होती.

12 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधान परिषदेत जाणारे सर्व 11 सदस्य हे विधानसभेच्या आमदारांद्वारे निवडले जातात. विधानसभेत सध्या महायुतीकडे भाजपा – 103, मिंधे गट – 37, अजित पवार गट – 39, इतर छोटे पक्ष 9 आणि अपक्ष 13 असे मिळून 201 आमदार आहेत. महाविकास आघाडीकडे शिवसेना – 15, काँग्रेस – 37, राष्ट्रवादी कॉंग्रेस – 13 तसेच शेकाप आणि अपक्ष असे 67 आमदार आहेत. या संख्याबळानुसार, महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 आमदार सहज निवडून येऊ शकतात. अशा वेळी महाविकास आघाडीने अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्याने महायुती चक्रावली आहे.

उमेदवार…
– शिवसेना – मिलिंद नार्वेकर
– काँग्रेस – प्रज्ञा सातव
– शेकाप – जयंत पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थन)
– भाजप – पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत
– मिंधे गट – भावना गवळी आणि कृपाल तुमाने
– अजित पवार गट – राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे

– निवडणुकीपूर्वी आपल्या गटातील आमदार फुटणार अशा चर्चेने मिंधे गट आणि अजित पवार गट टेन्शनमध्ये आहेत. या दोन्ही गटातील आमदार शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपका&त असल्याची चर्चा विधिमंडळातही रंगली होती. अजित पवार गटाचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून सतत होत आहे. पक्षासाठी दिलेले योगदान आणि स्वगृही परतण्याचे कारण योग्य वाटले तर फुटलेल्या आमदारांना पुन्हा पक्षात घेण्याबाबत विचार होऊ शकतो, असे खुद्द शरद पवारही म्हणाले होते.