तीनही जागा जिंकणारच; विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीची रणनीती

महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. 12 जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रणनीती या बैठकीत ठरवण्यात आली. विधान परिषदेच्या तीनही जागा जिंकणार असा निर्धार आघाडीने केला असून आगामी विधानसभा निवडणुकीलाही एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती. महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार निवडून आलेच पाहिजेत यादृष्टीने या बैठकीत सखोल चर्चा झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी याची जबाबदारी आघाडीच्या काही महत्वाच्या नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. विधान परिषदे सोबत विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू करावी असे मतही या बैठकीत नेत्यांनी मांडल्याचे समजते.

या बैठकीला शिवसेना नेते- युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, यांच्यासह कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नसीम खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, रोहित पवार आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत
जनतेचे आभार मानण्यासाठी काय करता येईल त्यावर बैठकीत चर्चा झाली. सर्व घटक पक्षांना घेऊन आम्ही आगामी निवडणुका एकत्र लढणार आहोत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. सत्ताधारी संविधान बदलणार होते तो नरेटिव्ह नाही तर सत्य आहे, असे सांगतानाच, भाजप संविधान बदलणार होता, मनुस्मृती आणणार होता, आम्ही सत्य सांगतोय असे आव्हाड म्हणाले. मागच्या दीड वर्षात महागाई 300 पट वाढली. संसार चालवायला, घरगुती समान आणायला किमान 4000 रुपये लागतात. बेरोजगारी वाढली आहे. लोकांना काम हवंय असेही आव्हाड यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणूक एकत्र लढणार – पृथ्वीराज चव्हाण
आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेतला असल्याची माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी महाविकास आघाडीचे जिल्हानिहाय मेळावे घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जाहिरनामा, प्रचार, संयुक्त सभा, मेळावे याबाबतही प्राथिमक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही महाविकास आघाडी एकसंधपणे लढेल असे सांगितले.

पदाधिकाऱयांचा संयुक्त मेळावा लवकरच
महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱयांचा मेळावा लवकरच मुंबईत आयोजित केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत आघाडीला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार त्याद्वारे व्यक्त केले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने अनेक मुद्दय़ांवरून भाजप आणि सत्ताधाऱयांची कोंडी केली होती. विधानसभा निवडणुकीत तसे कोणते मुद्दे घेता येतील त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.