नरेश गोयलांना हायकोर्टाचा दिलासा, अजून चार आठवडय़ांचा अंतरिम जामीन मंजूर

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अजून चार आठवडय़ांचा अंतरिम जामीन उच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. या काळात गोयल यांची कर्करोगाची शस्त्रक्रिया होणार आहे.

 538 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गेल्या वर्षी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गोयल यांना अटक केली. पत्नीला कर्करोग झाल्याने अंतरिम जामीन मंजूर करावा, अशी मागणी करत गोयल यांनी याचिका दाखल केली. न्या. एन.आर. जमादार यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर मे महिन्यात सुनावणी झाली. न्यायालयाने गोयल यांना दोन महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला. त्यानंतर गोयल यांच्या पत्नीचे निधन झाले. अंतरिम जामिनाची मुदत संपत आल्याने गोयल यांनी नव्याने अर्ज केला.

गोयल यांच्यावर कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, असे अॅड. आबाद पोंडा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ही माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हे प्रतिज्ञापत्र सादर झाले. त्याची नोंद करून घेत न्या. जमादार यांनी गोयल यांची मागणी मान्य केली.