उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या रवींद्र वायकर यांचा ‘मॅनेज’ विजय उच्च न्यायालयाच्या तडाख्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून अपक्ष उमेदवारांना धमकी देण्यात येत आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणावर टिप्पणी करीत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिलेल्या धमकीला हिंदू समाज पक्षाचे भरत शाह यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका चुकीची असल्याचे विधान भातखळकर यांनी केले आहे. ते न्यायाधीश आहेत का? असा सवाल शाह यांनी केला आहे.
रवींद्र वायकर यांच्या विजयासाठी मतमोजणी केंद्रात अनेक गैरप्रकार करण्यात आले. त्यामुळे वायकर यांचा विजय अवैध घोषित करून उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालाला स्थगिती द्या, अशी मागणी भरत शाह यांनी याचिकेतून केली आहे. या याचिकेमुळे मिंधे गट व भाजपचे धाबे दणाणले आहे. त्याच अस्वस्थतेतून भाजप आमदार भातखळकर यांनी ‘लातों के भूत बातों से नाही मानेंगे’ अशी धमकी ‘एक्स’च्या माध्यमातून दिली आहे. त्यांच्या धमकीला भरत शाह यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. आमची याचिका चुकीचे ठरवणारे भातखळकर न्यायाधीश समजतात का? आम्ही सादर केलेले पुरावे न्यायालय विचारात घेईल. भातखळकर न्यायप्रविष्ट प्रकरणाबाबत धमकी कशी देतात? असा प्रश्न शाह यांनी उपस्थित केला आहे.