हिंगोलीत आज मराठा आरक्षण जनजागृती रॅली

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे यासाठी शनिवारी हिंगोलीत मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत साडेतीन लाख मराठा बांधव सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभारणारे मनोज जरांगे-पाटील हे रॅलीत सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळला नाही. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी असताना सरकारने वेगळय़ा प्रवर्गाचा घाट घालून 10 टक्के आरक्षण दिले आणि मराठा समाजाची फसवणूक केली. सरकारने दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी अलीकडेच मनोज जरांगे यांनी चौथ्यांदा उपोषण केले. उपोषण सोडवण्यासाठी आलेले मंत्री शंभुराज देसाई यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी महिनाभराची मुदत मागून घेतली. 13 जुलै रोजी ही मुदत संपत आहे. त्यापूर्वी 6 जुलै ते 13 जुलै संपूर्ण मराठवाडय़ात मराठा समाजाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात येणार असून त्याचा पहिला मान हिंगोली जिल्हय़ाला मिळाला आहे. भव्यदिव्य स्वरूपात रॅली काढण्यासाठी महिनाभरापासून नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी वेगवेगळय़ा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.