लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज अलीगडमधील हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना धीर दिला. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि काळजी करू नका, आम्ही आहोत; आता तुम्हीच आमचे कुटुंब अशा शब्दांत मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
राहुल गांधी यांनी हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांकडून अपघाताची माहिती घेतली, त्यांची आपबीती जाणून घेतली. तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तीन कुटुंबांना भेटल्यानंतर राहुल हाथरस येथे पोहोचले आणि एका उद्यानात हाथरस दुर्घटनेतील 4 मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतली. विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच दौरा आहे. याआधी निवडणुक जिंकल्यानंतर ते रायबरेली येथे पोहोचले होते. या दुर्घटनेचे राजकारण करायचे नाही परंतु, दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यात प्रशासन कमी पडले असेही राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, हाथरस येथील गावात सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला.