महाराष्ट्रासह हरियाणा व झारखंडमध्ये होणाऱया आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाच मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असलेल्या विनोद तावडेंच्या मनोरथावर पाणी फिरले आहे. तावडेंची आज भाजपने बिहारच्या प्रभारीपदी पुन्हा नियुक्ती केल्याने, त्यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे.
भाजपचे महासचिव अरुणसिंग यांनी आज पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आदेशाने देशातील जवळपास 24 राज्यांच्या प्रभारी व सहप्रभारींची घोषणा केली. त्यात भाजपच्या अध्यक्षपदासाठी मीडियातून नाव चर्चेत असलेल्या विनोद तावडे यांच्याकडे पुन्हा बिहारचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली गेल्याने त्यांचे नाव या स्पर्धेतून बाद झाल्याचे मानले जात आहे. काही राज्यातील विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतरच वर्षाखेरीस नव्या भाजपाध्यक्षाची निवड केली जाऊ शकते, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली. केंद्रीय मंत्रीपद व अध्यक्षपद अशी दुहेरी जबाबदारी पार पाडण्यास नड्डा हे सक्षम आहे, अशी मल्लिनाथी एका नेत्याने खासगीत बोलताना केली.
रघुनाथ कुलकर्णी व गोपछडेंना नवीन जबाबदारी
महाराष्टातले भाजपचे नेते रघुनाथ कुलकर्णी यांना अंदमान निकोबारचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे तर राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांची दंगलीमुळे होरपळून निघत असलेल्या संवेदनशील अशा मणिपूरच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांची राष्ट्रीय राजकारणातून उचलबांगडी
लोकसभा निवडणुकीत बीडमधून पराभूत झाल्यानंतर पक्षाने विधान परिषदेची संधी दिलेल्या पंकजा मुंडे यांचीही राष्ट्रीय राजकारणातून उचलबांगडी करण्यात आली आहे. पंकजा यांच्याकडे असलेले मध्य प्रदेशचे सहप्रभारीपद काढून घेण्यात आले आहे. मध्यप्रदेशात दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष सतीश उपाध्याय यांना पंकजा यांच्या जागी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांचे महाराष्ट्र हेच कार्यक्षेत्र राहील, असे आजच्या नियुक्तीवरून स्पष्ट झाले आहे.