लेख – परदेशातील भारतीय कामगारांचे शोषण

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन,  [email protected]

युरोप, आखाती देश आणि अनेक प्रगत देशांमध्ये भारतातील कामगारांना रोजगार मिळतो. मात्र अनेक वेळा या कामगारांचे शोषण केले जाते. हे थांबवण्याकरिता भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु ते अपुरे पडत आहेत. भारतीय कामगारांचे परदेशांत होणाऱ्या शोषणाबरोबरच भारत आणि परदेशातील एजंट्सकडून नोकरीच्या नावाने स्त्रीपुरुषांची होणारी फसवणूक, तस्करी हादेखील गंभीर विषय आहे. यासाठी भारत सरकारने कठोर कारवाई करायला हवी.

भारतात पुरेसा रोजगार नाही, परदेशात जास्त पैसे मिळतात अशी समजूत आहे. यामुळे भारतीय कामगार परदेशात जातो. अलीकडेच परदेशात घडलेल्या अपघाताच्या, युद्धाच्या घटनांमुळे हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक भारतीय धोकादायक मार्गाने परदेशांमध्ये जातात आणि धोकादायक व्यवसाय करतात. ज्या वेळेला फसवणूक होते, त्या वेळेला त्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना भारत सरकारची आठवण येते. नंतर अर्थातच सरकार पूर्ण प्रयत्न करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.

गेल्या महिन्यात कुवेतमधील मंगाफ शहरात एका इमारतीला लागलेल्या आगीत 45 मजुरांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतांश तामीळनाडू आणि केरळचे नागरिक होते. या इमारतीत हे कामगार कोंबलेले होते. आगीच्या ज्वाळा, धुराने श्वास कोंडलेल्या अवस्थेत जीव वाचविण्यासाठी बाहेर पडण्यासही त्यांना वाव नव्हता. कारण गच्चीच्या दाराला टाळे होते. भारत सरकारच्या हस्तक्षेपानंतर कुवेतमध्ये मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना पुरेसा मोबदला दिला जात आहे आणि गुन्हेगारी कंपनीवर व मालकांवर कारवाई केली जात आहे. इटलीतील लॅटिना येथे सतनाम सिंग हा शेतात मजुरी करत असताना यंत्रामुळे अपघात घडून जखमी झाला. तो तशाच अवस्थेत रस्त्याकडेला पडून मृत्युमुखी पडला. भारत सरकारच्या तक्रारीनंतर इटली सरकारने कायदेशीर कारवाई सुरू केली. रशिया-युक्रेन युद्धात दोन भारतीयांचा मृत्यू झाला. रशियाने अशा शेकडो भारतीयांना शांततेच्या काळात नोकरीचे आमिष दाखवले आणि नंतर त्यांना बळजबरीने सैन्य प्रशिक्षण देऊन युद्धात पाठवले गेले. भारत सरकारने जाहीरपणे रशियाच्या राजदूतांना अशी भाडोत्री सैन्य भरती थांबवण्याचा इशारा दिला होता. रशियन सैन्यात यापुढे एकाही भारतीयाची भरती व्हायला नको, अशी मागणी भारताने केली. रशिया अशा तरुणांना परत पाठवत आहे. मात्र भारतीय किंवा परदेशी एजंट तिसऱ्या देशातून युक्रेन युद्धासाठी भरती करत आहेत.

इस्रायलने बांधकाम आणि इतर नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या पॅलेस्टिनींना वर्क परमिट देणे बंद केले. मजुरांच्या तीव्र टंचाईला तोंड देत असलेल्या इस्रायलने मग भारतासह इतर बाजारपेठांकडे मोर्चा वळवला. लेबनॉन सीमेजवळील हेझबोलाच्या हल्ल्यात एका केरळ कामगाराचा मृत्यू झाला. तरी पण अनेक भारतीय जास्त पगारामुळे तिथे जायला तयार आहेत. क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या वापरामुळे केवळ सीमावरती भाग हा युद्धभूमी नाही, पूर्ण इस्रायल किंवा आसपासचे आखाती देश हे युद्धभूमी बनलेले आहेत. जरी तुम्ही कामगार म्हणून गेला असला तरी आकाशातून झालेल्या फायरिंगमुळे मृत्यू होऊ शकतो.

कतारला फिफा विश्वचषक 2022 चे यजमानपद बहाल केल्यानंतर 13 वर्षांच्या कालावधीत फुटबॉल स्टेडियम बांधणाऱ्या हजारो आफ्रिकन आणि आशियाई कामगारांचे मृत्यू ही कदाचित जगासाठी सर्वात लाजिरवाणी बाब आहे. 2014 ते 2021 या कालावधीत सुमारे 2400 भारतीयांचाही मृत्यू झाल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केले. या कामगारांचा उष्णतेमुळे, निर्जलीकरणामुळे आणि दुर्लक्षामुळे मृत्यू झाला.

काही भारतीय तरुणांना थायलंडमध्ये 65 हजार रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून पाठवण्यात आले होते. पण तेथून बेकायदेशीररीत्या लाओस देशात नेऊन त्यांना सायबर फसणूक करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडण्यात आले. कॉल सेंटरमध्ये 30 भारतीय तरुण होते. तेथील कॉल सेंटरद्वारे अमेरिका, युरोप व कॅनडातील नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात येत होती. बहुतेक वेळा त्यांचे मोबाईल काढून घेतले जातात. पासपोर्ट गायब होतात. ज्यामुळे ते त्या देशांमध्ये बेकायदेशीररीत्या आले आहेत आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून अजून बेकायदेशीर काम करवले जाते. तेथे अडकलेल्या तरुणांनी याप्रकरणी स्थानिक भारतीय वकिलातीकडे तक्रार केल्यानंतर या तरुणांची सुटका करण्यात आली.

परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तीन महिलांना सहार पोलिसांनी अटक केली होती. दलालाने बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडे दिली होती, पण विमानतळावर या महिलांना अडवून अटक करण्यात आली. एका प्रकरणात मुंबईतील 24 वर्षीय तरुणीला हॉटेलमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून बहारिनला पाठवण्यात आले होते. तेथे दोन-तीन महिने तिला काम दिल्यानंतर तिचा मोबाईल व पासपोर्ट काढून घेऊन तिला वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. त्यानंतर तिला परदेशात पाठवणाऱ्या टोळक्याने तिच्या सुटकेसाठी दोन लाख रुपये मागितले. पैसे देऊन कुटुंबीयांनी मुलीची सुटका केल्यानंतर या टोळक्याने नेपाळ व भारतातून 600 मुलींना अशा प्रकारे बहारिनला वेश्या व्यवसायासाठी पाठवल्याचे उघड झाले होते. मानवी तस्करी करणारी टोळकी महिलांना, मुलांना परदेशात नेऊन त्यांना वेश्या व्यवसायास भाग पाडत असल्याचे अथवा भीक मागायला लावत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. किडनीसारखे मानवी अवयवही विकायला लावणाऱ्या टोळय़ा सक्रिय आहेत. त्यांना शोधून तुरुंगात घातले पाहिजे.

अर्थात नोकरीच्या नावाने फसवणूक केवळ भारतीयांचीच होते आहे असे नाही. अशीच फसवणूक बांगलादेशी, नेपाळी, पाकिस्तानी आणि आशिया व आफ्रिकेतल्या अनेक देशांतील नागरिकांची होत आहे. त्यांच्या सरकारने कितीही तक्रारी केल्या तरी आखाती देश, रशिया व युरोपमधील देश फारशी कारवाई करत नाहीत. त्यामानाने भारताची सामरिक ताकद जास्त असल्यामुळे भारताने केलेल्या तक्रारीवर लगेच दखल घेतली जाते आणि ज्यांनी बेकायदेशीर कृत्ये केली केले आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाते. हे सरकारच्या पातळीवर होत आहे. परंतु तरीही अनेक भारतातील आणि परदेशातले बेकायदेशीर कंपन्या किंवा एजंट्स अनेक भारतीय मजुरांवर अन्याय करत आहेत. त्यांना शोधून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली पाहिजे. ज्यामुळे परदेशात काम करणारे भारतीय हे सुरक्षित राहतील आणि त्यांच्या मानवी हक्कांचे भंग होणार नाही.