ठसा – पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव

>> मेधा पालकर

स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्त्या आणि अन्नपूर्णा महिला मंडळाच्या संस्थापिका पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव यांचे नुकतेच निधन झाले. गिरणी व्यवसायातून स्त्रिया बाहेर गेल्या, कामगार कायदे बदलले, त्या वेळी अनेक स्त्रियांना  एकत्र आणून प्रेमा पुरव यांनी ‘अन्नपूर्णा महिला सहकारी सोसायटी लिमिटेड’ ही संस्था सुरू केली. ताजे, सकस जेवण ही मुंबईतील नोकरदारांची गरज होती आणि या स्त्रियांना अर्थार्जनाचा  मार्ग प्रेमा पुरव यांनी शोधून दिला. स्त्रियांच्या स्वावलंबनाचे  मोठे काम उभे राहिले. प्रेमा पुरव यांचे मजबूत संघटन कौशल्य यामागे होते.

प्रेमाताई पुरव यांचा जन्म 15 ऑगस्ट 1935 रोजी गोव्यात सधन कुटुंबात झाला, पण तळागाळातील स्त्रियांशी त्यांचे हे नाते कसे जुळले, याची अत्यंत हृद्य आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली. त्या म्हणाल्या, त्यांच्या आईला त्या  उशिरा झालेले अपत्य होत्या. त्यामुळे त्यांची दूधआई वेगळी होती. त्यांच्या घरात काम करणारी ही स्त्री तळागाळातून आली होती. तिच्यामुळे त्यांचा स्वतःच्या कौटुंबिक परिस्थितीपेक्षा वेगळ्या आर्थिक-सामाजिक वर्गाशी जवळून संबंध आला. तळागाळातील समाजाची दुःखे जवळून पाहता आली आणि त्यातूनच पुढच्या वाटा सापडत गेल्या, असे त्या सांगत. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी आपला भाऊ काशीनाथ याच्यासोबत स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. पुढे त्या गोवा मुक्ती संग्रामात कार्यरत राहिल्या. तिथेच त्यांनी कृष्णा मेणसे यांच्याकडून साम्यवादाची दीक्षा घेतली.

प्रेमाताईंनी अतिशय लहान वयात त्यांच्या गावच्या म्हणजे गोव्याच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतला होता. पोलीस ज्या पत्रकांचा शोध घेत घरी आले होते, ती त्यांनी प्रसंगावधानाने चक्क झाडाखाली पुरून ठेवली. पुढील एका आंदोलनादरम्यान त्यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. त्यांना बेळगावच्या रुग्णालयात दीड वर्ष आणि पुढे मुंबईत जवळ जवळ सहा महिने उपचार घ्यावे लागले. पाय बरे झाल्यावर त्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी गोदावरी परुळेकरांकडे पाठवण्यात आले. ‘‘तिथून मी आले ते त्या सामाजिक कामाची स्वच्छ आणि नितळ दृष्टी घेऊनच,’’ असे त्याच सांगत. ज्यांच्याकडे काहीच नाही, अशा स्त्रियांना आधार देणे, जगण्याची कौशल्ये शिकविणे, त्यांचे आर्थिक सबलीकरण हे काम प्रेमाताईंनी आयुष्यभर केले. ‘अन्नपूर्णा’मार्फत स्वयंरोजगार, शिक्षण, घरदुरुस्ती यासाठी स्त्री-पुरुषांना विनातारण कर्ज दिले जात असे. स्त्रियांना घरी मानाचे स्थान मिळावे, त्यांनी संघटित, स्वयंपूर्ण व्हावे यासाठी प्रेमाताईंनी आयुष्यभर प्रयत्न केले. मुंबईत त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या कम्युनमध्ये काही काळ योगदान दिले.

प्रेमाताई यांचा दादा पुरव यांच्याशी प्रेमविवाह झाला. दादा हे देशातील मोठी संघटना एआयबीईएचे प्रमुख नेते होते. निवृत्तीनंतर दादा पुरव आणि प्रेमाताई संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातही सहभागी झाले होते. प्रेमाताई यांनी 1960 नंतर भारतीय महिला फेडरेशन, गिरणी कामगार युनियन, महागाई प्रतिकार संयुक्त महिला समितीसोबत काम केले. 1975 मध्ये प्रेमाताई यांनी दादा पुरव यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नपूर्णा महिला मंडळाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात अन्नपूर्णा महिला मंडळाने गरीब खाणावळवाल्या महिलांना सावकारीतून मुक्त करण्यासाठी काम केले. त्या वेळी आणीबाणीचा काळ होता. अल्प व्याजदराने दुर्बल घटकांतील व्यक्तींना कर्ज देण्याची योजना अस्तित्वात आली. त्याचा फायदा हजारो खाणावळ चालवणाऱ्या महिलांना झाला.

प्रेमाताई यांना त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने 2002 मध्ये  पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला. याव्यतिरिक्त त्यांना दुर्गाबाई देशमुख पुरस्काराने गौरविण्यात आले होते. प्रेमाताईंना  अखिल भारतीय महिला शिक्षण निधी संस्थेचा स्त्रीरत्न पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या ज्येष्ठ कन्या डॉ. मेधा पुरव सामंत यांनी अन्नपूर्णा परिवाराच्या माध्यमातून गेल्या तीस वर्षांत पुणे, मुंबई येथे महिला सक्षमीकरणाचे कार्य विस्तारित केले आहे. सहा भगिनी संस्थांच्या मार्फत गरीब महिलांच्या सक्षमीकरणासाठी लघुवित्त, लघुविमा, आरोग्य विमा, कुटुंब विमा, जीवन विमा, शैक्षणिक शिष्यवृत्ती, लहान मुलांसाठी पाळणाघरे व म्हातारपणासाठी आधारपूर्ण योजना अशा विविध सेवांचे जाळे त्यांनी राज्यभर उभारले आहे. पुण्यातील हजारो महिलांना त्यांनी आधार दिला.