
अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर महाविकास आघाडी उत्तर देऊ शकत नाही. त्यावर महायुतीने उत्तर दिले पाहिजे. कारण अजित पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनीच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
ट्रकभरून पुरावे देणार, गुन्हे दाखल करणार, तुरुंगात टाकणार ही सगळी वक्तव्ये फडणवीस यांचीच होती. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अजित पवार यांनी त्यांनाच विचारले पाहिजे, माझ्या तीन बहिणींवर छापे टाकण्यात आले. त्यांचा काय संबंध होता? असा सवाल करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकजूट असताना आयटी, सीबीआय आणि ईडीमार्फत कारवाई करण्यात आली. त्याला सत्तेत असणारे लोकच जबाबदार आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लोकशाहीत प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. पण अजित पवारांनी संवाद साधण्यासाठी केलेला व्हिडीओ सरकारचा आहे की पक्षाचा, व्हिडीओत पक्षाचे चिन्ह होते. त्यामुळे तो व्हिडीओ त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरून केलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून केला हा संभ्रम माझ्या मनात असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरून कोर्टात केस सुरू आहे. त्यामुळे निर्णय येईपर्यंत चिन्ह वापरताना त्याखाली फूटनोट असलीच पाहिजे. त्याचा विसर पडला का, असा सवालही त्यांनी केला. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत असल्याची टीका त्यांनी केली.