
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी आज आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाहीत असा दावा करतानाच, आपण राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदलला नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश अशी कॅप्शन देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये अजित पवार म्हणतात, मी राजकारणात आल्यापासून कोणता पक्ष बदलला नाही. पार्टी बदलली नाही. राजकारणात आल्यापासून जनता हाच माझा पक्ष राहिला आहे. मी जनतेच्या हिचाचाच विचार करतो. मधल्या काळात माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे-नाटे आरोप झाले. माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही, ना भविष्यात होईल. जो जास्त काम करतो त्याला जास्तीचा विरोध होतो.
अर्थसंकल्पावर अनेक लोक अकारण टीका करत आहेत. काहींनी लबाडाच्या घरचं आवतान म्हणून हिणवले आहे, असं सांगत अजित पवार यांनी विरोधकांची टीका फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. 44 लाख शेतकऱयांचे वीज बिल माफ केले असे अजित पवार यांनी म्हटले आहे, परंतु वीज बिलाची थकबाकी माफ न केल्याबद्दल झालेल्या आरोपावर स्पष्टीकरण देण्याचे टाळले. शेतकऱयांच्या शेतमालाला हमीभाव, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱयांना काहीच दिलासा सरकारने दिलेला नाही याबद्दलही ब्र काढलेला नाही.