![akkalkot](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/akkalkot--696x447.jpg)
सुपारी घेऊन हत्या करण्यामध्येही भाजप नेत्यांचे हात बरबटलेले असल्याचे समोर आले आहे. अक्कलकोट तालुक्यातील माजी आमदार सिद्धराम आप्पा पाटील यांची प्रचंड दहशत असून गेल्या 20 वर्षांत झालेल्या तब्बल 20 हत्यांमध्ये सहभाग असूनही ते समाजात उजळमाथ्याने वावरत असल्याचा आणि मालमत्तेसह विविध कारणांसाठी सुपारी घेऊन त्यांचा हत्येचा धंदाच असल्याचा आरोप अक्कलकोट तालुक्यातील जनताच करत आहे. सलगर गावातील हणमंत पोलाशे आणि भीमाशंकर पोलाशे यांच्या निर्घृण हत्येत सहभाग असूनही सिद्धराम आप्पा पाटील यांच्याविरोधात आणि इतर आरोपींविरोधात पोलीसच गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोप होत आहे. हत्या झालेल्या या दोघांचे कुटुंबीय विधानसभा अधिवेशनात तरी आपले ऐकून घेतले जावे असा आक्रोश करत सोमवारपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावातील राजशेखर आप्पाराव पोलाशे यांचे बंधू हणमंतराव आप्पाराव पोलाशे 2010 पासून बेपत्ता झाले. परंतु, त्यांची हत्या झाल्याचा राजशेखर यांचा दावा आहे. तर धोंडाप्पा श्रीकांत पोलाशे यांचे बंधू भीमाशंकर श्रीकांत पोलाशे यांची गेल्याच महिन्यात हत्या करण्यात आली. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, तपासात प्रगती नाही. हणमंतराव पोलाशे प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांची तपास पुर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली, असाही राजशेखर यांचा दावा आहे. चंद्रकांत कालीभत्ते, हणुमंत भडोळे, मलाप्पा पोलाशे, सुरेश आणि उमेश पोलाशे यांनी हणमंतराव यांची हत्या केल्याचा राजशेखर यांना संशय आहे. दरम्यान, आपल्या व नातेवाईकांच्या जिवाला धोका असल्याची भीती राजशेखर पोलाशे आणि धोंडाप्पा श्रीकांत पोलाशे यांनी व्यक्त केली आहे.
एकाच गावातील या 20 जणांची हत्या
शशिधर कालीभत्ते, नागप्पा इकलकी, सिदाराम भडोळे, हणमंत, पोलाशे, भीमाशंकर पोलाशे, सुरेखा व्होरपेटे, धर्मण्णा कोळी, दत्ता कोळी, हणमंत पंभार, शंकर पुढगे, भफास्कर पुढगे, तुकाराम चिंचोळीकर, शामराय चिकमळ, गिरमल चिकमळ, श्रीसेल नरोणे, बसण्णा परीट, विठ्ठल सलगरे, रासक्का सलगरे, चंद्रभागा पाटील आणि कुमार न्हावी यांची पत्नी या 20 जणांची गेल्या 20 वर्षांत हत्या झाल्याचा दावा राजशेखर पोलाशे यांनी केला.
जमिनीच्या वादातून हत्या
राजशेर पोलाशे यांच्या आजोबांनी सिद्धराम आप्पा पाटील यांच्या नातेवाईकांकडून जमीन खरेदी केली होती. ही जमीन कसून त्यांचे कुटुंबीय उदरनिर्वाह करत आहेत, परंतु आता ही जमीन आपल्या नावावर करून द्यावी अशी मागणी सिद्धराम आप्पा पाटील यांचे नातेवाईक चंद्रकांत कालीभत्ते आणि हणुमंत भडोळे हे करत आहेत. हणमंतराव पोलाशे आणि कालीभत्ते तसेच भडोळे यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यानंतर कोल्हापूर येथून हणमंतराव पोलाशे हे बेपत्ता झाले. त्याला आम्हीच मारले असून तुला काय करायचे ते कर, तुम्हा सर्वांचाच काटा काढू अशी धमकी कालीभत्ते आणि भडोळे देत असल्याचा दावा राजशेखर पोलाशे यांनी केला. तसेच आरोपींना सिद्धराम आप्पा पाटील यांचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.