बार्बाडोसमधील चक्रीवादळामुळे वेस्ट इंडीजमध्ये अडकून पडलेला जगज्जेता हिंदुस्थानी क्रिकेट संघ अखेर गुरुवारी मायदेशी परतला. दक्षिण आफ्रिकेला नमवून टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरून तब्बल 17 वर्षांचा दुष्काळ संपविणाऱया हिंदुस्थानी संघाचे राजधानी दिल्लीत जंगी स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जगज्जेत्या संघाने दीड तास गप्पा मारल्या. जेतेपदाला गवसणी घातल्यावर रोहित, तू खेळपट्टीची माती चाखलीस कशी चव होती?, सूर्यकुमार, तू काय अफलातून झेल टिपलास ते 7 सेपंद तुझ्यासाठी कसे होते? अशा मिश्कील व हलक्याफुलक्या प्रश्नांनी संवाद साधत मोदींनी जगज्जेत्या टीम इंडियाचे तोंडभरून कौतुक केले.
गुरुवारी सकाळी हिंदुस्थानी संघाचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांनी दिल्लीतील 7 जनकल्याण मार्ग या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत पंतप्रधानांनी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पंडय़ा आणि सूर्यकुमार यादव यांना काही प्रश्न विचारले. रोहित शर्माने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर थरारक विजय मिळवल्यानंतर बार्बाडोसच्या मैदानाच्या खेळपट्टीची माती तोंडात टाकली होती. हाच धागा पकडून मोदींनी मातीची चव कशी होती, असा मिश्कील प्रश्न करताच खेळाडूंमध्ये हशा पिकला. वर्ल्ड कपमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करू न शकलेल्या कोहलीला मोदींनी विचारले की, या स्पर्धेत तुझ्या फार धावा होत नव्हत्या. मग अंतिम सामन्यापूर्वी तुझ्या डोक्यात काय विचार सुरू होते? कोहली बाद झाल्यानंतर संघ संकटात असताना तुला अचानक बढती देऊन वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले तेव्हा तुझ्या मनात कोणते विचार घोळत होते? असे पंतप्रधान मोदी यांनी अक्षर पटेलला विचारले.
मुंबईचा राजा, रोहित माझा
मुंबईकर क्रिकेटप्रेमींचे स्पिरिट आज ओसंडून वाहत होते. मुंबई लोकल असो किंवा वानखेडे-मरीन ड्राइव्हचा परिसर. जागोजागी फक्त हिंदुस्थान प्रेमाचा आणि रोहित प्रेमाचा गजर होत होता. ‘मुंबईचा राजा, रोहित माझा’ ही आगळी घोषणा मुंबईकरांचा उत्साह द्विगुणीत करत होती. आम्ही आमच्या रोहितच्या कर्तृत्वाला आणि टीम इंडियाच्या जोशाला सलाम ठोकायला आल्याचे मुंबईकर क्रिकेटप्रेमी अभिमानाने सांगत होते.