
राज्यात चोर आणि लुटारूंचे सरकार आहे. राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. करोडोंची जमीत बिल्डरांच्या घशात घातली जात आहे. महायुती सरकारच्या दुग्धविकास खात्याने 20 हजार कोटी रुपयांची साडेआठ हजार हेक्टर जमीन कवडीमोल भावात उद्योगपती अदानींच्या घशात घातली. अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहेत आणि राज्याचे प्रमुख त्यांना पाठीशी घालत आहेत. बलिदान देऊन मुंबई वाचवली त्या हुतात्म्यांचा हा अवमान आहे, असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या चोरांपासून मुंबईला वाचवा, असे आवाहन त्यांनी सभागृहात केले.
विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत महायुती सरकार आणि अदानी यांच्यातील संबंधांवर टीका केली. भ्रष्टाचाराचे आरोप विरोधकांनी केले की सरकार स्वच्छ असल्याचे सांगते, सती पतिव्रता असल्याचे सांगते आणि विरोधी पक्ष खोटे नरेटीव्ह सेट करतो असे सांगते. त्याच सरकारने नुकताच एक जीआर काढला. दुग्धविकास विभागाची साडेआठ हेक्टर जागा सरकारने अदानींच्या घशात घातली, असे सांगत वडेट्टीवार यांनी तो जीआरही सभागृहात झळकावला. हा अदानी कोण लागलाय? हा कोणाचा पोशिंदा आहे? तो कोणाला पैसे देतोय? असा सडेतोड जाबही त्यांनी विचारला.
कुर्ला दुग्धशाळेची ही सर्व्हे नंबर 229ची जमीन आहे. 10 जून 2024 रोजी एकाच दिवशी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाकडून महसूल विभागाकडे आणि महसूलकडून अदानींना हस्तांतरीत करण्यात आली, असे वडेट्टीवार म्हणाले. या हस्तांतरणाला दुग्धविकास आयुक्त तुकाराम मुंडे यांनी विरोध केला होता. त्यासंदर्भात त्यांची नोटही आहे. त्यामुळेच ग्यानबा हरी आणि तुकाराम घरी. तुकाराम मुंडेंची बदली केली गेली. असे हे सरकार ग्यानबा तुकाराम म्हणून सोंग दाखवून, ढोंग करून महाराष्ट्राला फसवतेय, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. सरकारमध्ये दम असेल तर तुकाराम मुंडेंची ती नोट काय आहे ती पटलावर ठेवा, असे आव्हानही वडेट्टीवार यांनी दिले.
विजय वडेट्टीवार यांनी या वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, धारावी प्रकल्पात 550 एकर जागा अदानींना दिली गेली. त्यानंतर 1203 एकर दिली गेली आणि नंतर मिठागराची जागाही दिली गेली. मिठागराची एक इंचही जागा दिली नाही, असा दावा तोतरा बोलणाऱया एका भाजपा नेत्याने केला होता, पण आदेश काढून मिठागराची जागाही विकली गेली, असे वडेट्टीवार म्हणाले.
ही केवळ दोनच प्रकरणे आज सभागृहात आली, उद्या आणखी येतील असा इशारा देतानाच विजय वडेट्टीवार यांनी, अदानीपासून मुंबईला वाचवा, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांनाही केली. चोर-लुटारूंचा बाजार भरलाय, महानगरपालिकाही साफ केली जात आहे, मुंबईला वाचवा, असे ते म्हणाले.
या प्रकरणी सरकारने सभागृहात खुलासा करावा, अशी मागणी करतानाच या गंभीर विषयावर चर्चा करावी, असा आग्रह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. मात्र त्यानंतरही अध्यक्षांनी दखल न घेतल्याने ‘अदानींना मुंबई विकणाऱया सरकारचा निषेध असो’ अशा जोरदार घोषणा विरोधकांनी दिल्या.
हजारो कोटींची जमीन 25 टक्के दरात
मुंबई बिल्डरांच्या घशात घातली जात आहे. मुंबई विकली जात आहे. मोक्याच्या जागा अदानींना दिल्या जात आहेत. दुग्धविकास विभागाच्या या जीआरबद्दल सरकारने सभागृहात खुलासा करावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. हजारो कोटींची ही जमीन अदानींना 25 टक्केच दर घेऊन दिली गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मिंधे सरकारने मुंबईतील जमिनी सरसकट अदानीच्या घशात घालण्याचा सपाटा लावला आहे. किमान 2 लाख कोटी रुपयांच्या जमिनी अदानीला कवडीमोल दरात दिल्या जात आहेत. हा सरकारचा महाघोटाळा आहे. या घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांपासून सगळेच सामील आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. अदानीकडे मुंबई गहाण ठेवण्याचा जो प्रयोग सुरू आहे तो थांबलाच पाहिजे.