
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक आमदारांचे संख्याबळ नसतानाही सत्तेच्या जोरावर महायुतीकडून नऊ उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले आहेत. त्याला तोडीस तोड देत महाविकास आघाडीचे तीन शिलेदार मैदानात उतरल्याने महायुतीच्या गोटात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. काही केल्या मतांचे गणित जमत नसल्याने आमदारांची मनधरणी करण्यासाठी सत्ताधाऱयांची धावाधाव सुरू आहे.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ लक्षात घेता विजयासाठी पहिल्या पसंतीची 23 मते प्रत्येक उमेदवाराला गरजेची आहेत. सत्ताधारी पक्षाची एकत्र ताकद पाहता महायुतीचे आठ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार सहज विजयी होतील. 11व्या जागेसाठी महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांत चुरस होणार आहे. मित्रपक्षांमुळे महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. यामुळे महायुतीच्या गोटात मात्र कमालीची अस्वस्थता असून अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सत्ताधाऱयांकडून सुरू आहेत.
मतांची फाटाफूट होण्याचा धोका
– गुप्त मतदान असल्याने मतांची फाटाफूट मोठय़ा प्रमाणावर होऊ शकते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्नही सत्ताधारी गटाकडून सुरू असला तरी माघार कोणी घ्यायची यावर एकमत होणे अवघड आहे.
– मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने शिंदे आणि अजित पवार गटाच्या आमदारांत नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजप आमदारांत अस्वस्थता असून सोबत असणारे अपक्ष आमदार साथ सोडण्याची भीती आहे.
महाविकास आघाडीची एकजूट
काँग्रेसकडे 37 आमदार असल्याने प्रज्ञा सातव या सहज निवडून येतील. शिवसेनेकडे 15 आणि अपक्ष शंकरराव गडाख असे एकूण 16 आमदार आहेत. त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना 7 अतिरिक्त मतांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे 12 आमदार असून शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला आहे. जयंत पाटलांना विजयासाठी 13 मते हवी आहेत. कॉँग्रेसकडील अतिरिक्त मते आणि सपा 2, शेकाप आणि माकप प्रत्येकी एक अशी एकूण 69 मते असून महाविकास आघाडीच्या एकजुटीने तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे.
महायुतीत टेन्शन
भाजपकडे 103 आणि अपक्ष आणि इतर पकडून 111 आमदार आहेत. त्यांचे 4 उमेदवार सहज निवडून येतील, पण पाचव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपला 4 मतांची गरज आहे.
शिंदे गटाकडे 37 आणि अपक्ष 6 असे 43 आमदार आहेत. त्यांचे 2 उमेदवार रिंगणात असून दुसऱया उमेदवारासाठी त्यांना 3 अतिरिक्त मतांची गरज आहे.
अजित पवार गटाकडे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत. त्यांचेदेखील 2 उमेदवार निवडणुकीत आहेत. त्यांना दुसरा उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मतांची आवश्यकता आहे.
हे उमेदवार रिंगणात
महाविकास आघाडीकडून मिलिंद नार्वेकर (शिवसेना), डॉ. प्रज्ञा सातव (कॉँग्रेस), जयंत पाटील (शेकाप), तर महायुतीकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत (भाजप), भावना गवळी, कृपाल तुमाने (शिंदे गट) आणि राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे (अजित पवार गट) निवडणुकीच्या रिंगणात आहेत.