मुंबई महापालिकेच्या सायन, नायर, केईएम रुग्णालयातील दुरवस्थेवर शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानसभेत जोरदार आवाज उठवला. त्यानंतर नायर रुग्णालयात दोन सीटी स्कॅन मशिन्स तातडीने खरेदी करण्याचे आदेश मंत्री उदय सामंत यांनी दिले. त्याचबरोबर सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या कामाचे टेंडर काढण्याच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबाची प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत भाग घेताना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी नायर रुग्णालयाच्या नादुरुस्त मशीन्सकडे सभागृहाचे लक्ष वेधले. या सीटी-स्कॅन मशीन व एमआरआय मशीन्सचा गॅरंटी पिरियड 2019मध्ये संपला आहे. त्या आता दुरुस्तही होऊ शकत नाही याकडे लक्ष वेधत नायरसाठी दोन एमआरए मशीन्स तर सायन रुग्णालयासाठी एमआयआय मशीन्स देण्याची मागणी केली.
ट्रामा रुग्णालयात हृदयविकार तज्ञ नेमा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमधील आयसीयूमध्ये हृदयविकार तज्ञ नाही. त्यामुळे रुग्णाला दुसरीकडे पाठवतात, पण तोपर्यंत रुग्ण दगावतो. या ठिकाणी तत्काळ हृदयविकार तज्ञाची चोवीस तासांसाठी नियुक्ती करावी अशी मागणी सुनील प्रभू यांनी केली. गोरेगावमधील म. वा. देसाई रुग्णालयात आयसीयू होता, पण बंद पडलेला आहे. आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला, पण सुरू झालेला नाही याकडे सरकारचे लक्ष वेधले. हा आयसीयू सुरू झाला तर उपनगरवासीयांना त्याचा फायदा होईल. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने सुरू केले, पण आज या दवाखान्यांत डॉक्टर असले तर औषधे नाहीत, नर्सेस नाहीत. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा.
केईएमवर देशातील रुग्णांचा ताण
शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केईएम रुग्णालयाचा विषय उपस्थित केला. गेल्या दोन वर्षांपासून के.ई.एम. रुग्णालयाचा बोजवारा उडाला असून रुग्णालयातील असुविधांमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयावर क्षमतेच्या बाहेर ताण असल्याने दोन खाटांमध्ये जमिनीवर रुग्णांना झोपवून उपचार केले जातात. केईएममधील सीटी स्कॅन, एमआरआय मशीन बंद असतो. क्षमतेच्या बाहेर मशीनवर रुग्ण तपासले जात असल्याने मशीन बंद पडते. खासगी केंद्रात रुग्णांना चाचण्यांसाठी पाठवले जाते. या रुग्णालयात मशीन्स येतील असे आश्वासन दिले जाते, पण मशीन आले नाही. औषधे नाहीत. श्वानदंशावरही औषधे नाहीत. लोकांना बाहेरून औषधे घ्यावी लागतात. चाचण्या, एक्स-रे बाहेरून आणायला सांगतात. केईएम प्रशासनातील असुविधांना सेंट्रल पर्सेच डिपार्टमेंट सर्वप्रथम बरखास्त करा, अशी मागणी अजय चौधरींनी केली.