गोरेगाव (पूर्व) येथील आरे वसाहतीत दुग्ध वसाहत स्थापनेच्या आधीपासून 27 आदिवासी पाडे आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास न होता समतोल राखण्यासाठी येथील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आरे कॉलनीत नवीन प्रकल्पांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी केली.
आरेतील आदिवासी पाडय़ांमध्ये लोक शेती व्यवसाय करून अद्यापही राहत आहेत. शासनाच्या नियमानुसार करही भरत आहेत. आदिवासी हक्क संवर्धन समितीने यासंदर्भात मला पत्र पाठवले आहे. आदिवासी पाडे वन विभागातून वगळण्याकरिता सीमांकनाच्या कामात प्रशासनाचे कर्मचारीच सोयीनुसार मनमानी करून हद्द निश्चित करीत आहेत. पण आदिवासांच्या हद्दीवरील वाघदेव आणि गावदेव ही आस्थेशी जोडलेली देवस्थाने आदिवासी पाडय़ात असावीत अशी मागणी आदिवासींनी केली आहे. आदिवासी पाडय़ांना गावठाणचा दर्जा देऊन घरकुल योजना राबवण्याची आदिवासींची मागणी आहे. येथे नवीन प्रकल्पाला मंजुरी देऊ नये, अशी मागणी आदिवासी समितीने केली आहे. पण तरीही शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. पण शासनाने या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली.